IndiaNewsUpdate : मयत भाजप समर्थक असल्याचे सांगून नमाज अदा करण्यास इमामाने दिला नकार…
मुरादाबाद : 23 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंडरकी पोलीस स्टेशन परिसरात एका मुस्लिम व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जेव्हा त्याच्या अंत्यसंस्काराची वेळ आली तेव्हा इमामला नमाज अदा करण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र इमामने नवाजचे पठण करण्यास नकार दिला. मृत भाजप समर्थक असल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. यानंतर कुटुंबीयांनी नातेवाइकांना बोलावून नमाज अदा केली आणि अंत्यसंस्कार केले. या संपूर्ण प्रकरणाबाबत मृतांच्या कुटुंबीयांनी डीएम आणि एसएसपी यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत मृताचा मुलगा दिलनवाज खान याने सांगितले की, माझ्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याला दफन करण्यापूर्वी, इमामला शेवटच्या नमाजसाठी बोलावण्यात आले, परंतु इमामने नमाज अदा करण्यास नकार दिला. मात्र, मी त्यांना नमाज न पडण्याचे कारण विचारले असता त्यांनी भाजप समर्थकाची नमाज अदा करणार नसल्याचे सांगितले. या प्रकरणी ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी मुरादाबादचे डीएम अनुज कुमार सिंह यांचेही वक्तव्य आले आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामध्ये असे म्हटले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तेव्हा इमामने शेवटची नमाज अदा केली नाही. तक्रारीच्या आधारे आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. चौकशीनंतर कारवाई केली जाईल. त्याचवेळी, या संपूर्ण प्रकरणात आरोपी इमाम रशीदला मीडियाने विचारणा केली असता, त्याने बोलण्यास नकार दिला होता.