ParliamentNewsUpdate : राहुल गांधी संसदेत असे काय बोलले ? की , झाला हंगामा …!!
मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर बोलताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या योजन आणि आर्थिक धोरणावर कडाडून हल्ला चढवला. यावेळी बोलताना , राहुल गांधी यांनी अदानी आणि अंबानीचा उल्लेख केला तेंव्हा एकाच गोंधळ झाला. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना थांबवले तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सुद्धा राहुल गांधी यांना थांबवण्याची सूचना केली. या दरम्यान काही काळ संसदेत सत्ताधिकारी आणि विरोधकांकडून गदारोळ झाला.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी ,अर्थसंकल्पातून देशातील शेतकरी, बेरोजगार तरुण, छोटे उद्योजक, कामगार यांना मदत केली जाईल असे वाटले होते पण या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केवळ धनाढ्य उद्योगपतींना आणखी बळ देण्यात आले आणि लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देण्यात आला असा आरोप केला.
दरम्यान पुढे बोलताना, राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत एकविसाव्या शतकातीच चक्रव्यूह बद्दल भाष्य केले आहे. राहुल गांधी म्हणाले, महाभारतात द्रोणाचार्य,कर्ण,कृपाचार्य, कृर्तवर्मा, अश्वधामा आणि शकुनी या सहा जणांनी मिळून अभिमन्यूला अडकवले तसेच आता एकविसाव्या शतकात आता नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, उद्योगपती अंबानी आणि अदानी यांचा समावेश आहे, आणि अभिमन्यू म्हणून चक्रव्यूहात देशातील तरुण, शेतकरी, माता भगिनी, छोटे मोठे व्यापारी यांना अडकवण्याचे काम सुरु आहे असा घणाघात केला.
पुढे राहुल गांधी म्हणाले, एकविसाव्या शतकात कमळाचा चक्रव्यूह आलाय. त्याच कमळाचे चिन्ह पीएम मोदी छातीवर लावून फिरतात. पण इंडिया आघाडी हे चक्रव्यूह भेदून राहणार, लोकसभा निवडणुकीत आम्ही चक्रव्यूह भेदून दाखवले आहे. संसदेत राहुल गांधी यांनी घेतलेल्या अदानी आणि अंबानीच्या उल्लेखानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना बोलताना थांबवले तसेच त्यांचे नाव न घेण्याची सूचना केली. यावर राहुल गांधी म्हणाले, मी त्यांना ए१ आणि ए२ अश्या टोपण नावाने उल्लेख करेन. यानंतर संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सुद्धा राहुल गांधींच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली.