Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : मोदी ३.० सरकारची पत्रकारांना मोठा दणका , काचेच्या खोलीत केले बंदिस्त !! संसद भवन परिसरात वार्तांकनावर बंदी ….

Spread the love

नवी दिल्ली : मोदी सरकारने संसद भवन परिसरात वार्तांकन करण्यास आता बंदी केली असल्याचे वृत्त आहे. सरकारच्या आदेशानुसार आता पत्रकारांना संसदेच्या परिसरात फिरून सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या बाईट्स, मुलाखती , प्रतिक्रिया घेता येणार नाहीत. नव्या नियमानुसार पत्रकारांना संसदेबाहेरील काचेच्या खोलीतून सर्व कामकाज कव्हर करावे लागणार आहे. या नव्या निर्बंधामुळे पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान प्रेस क्लब ऑफ इंडियाने (पीसीआय) पत्रकारांवर लादलेल्या या निर्बंधांचा निषेध केला आहे. प्रेस क्लब ऑफ इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पत्रकार एका छोट्या काचेच्या खोलीत बसलेले दिसत आहेत. सदर निर्बंध हटवण्याची मागणी पीसीआयने केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आधीच्या परंपरेप्रमाणे नवीन संसद भवनाच्या मकर गेटवर पत्रकार खासदारांच्या प्रतिक्रिया घेत असत, परंतु त्यांना आता तिथे उभे राहून वार्तांकन करण्यास, खासदारांच्या , मंत्र्यांच्या प्रतिक्रिया घेण्यास , त्यांच्याशी बातचीत करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी आता मकर गेटसमोर काचेची खोली बनवण्यात आली असून आता तेथूनच पत्रकार खासदारांचे कामकाज कव्हर करत आहेत. या कक्षात जागा कमी असल्याने पत्रकारांची गैरसोय होत असल्याची तक्रार पत्रकारांनी केली आहे.

काँग्रेसकडून निर्बंधांना विरोध

दरम्यान या प्रकरणी काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेट यांनी आवाज उठवला असून त्यांनी एक व्हिडिओ शेअर करून प्रेसवरील या बंदीचा निषेध केला आहे . पूर्वीप्रमाणेच पत्रकारांना वार्तांकन करण्याची मागणी त्यांनी केली असून सरकारच्या या निर्बंधामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधींनी घेतली पत्रकारांची भेट….

मकर गेटसमोर वार्तांकन करण्यास पत्रकारांना बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळताच , लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या निर्बंधांबाबत चिंता . व्यक्त करून पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी पत्रकारांना दिले आहे. ”लोकशाहीत पत्रकारांना मोकळेपणाने काम करण्याचा अधिकार मिळायला हवा. तसे झाले नाही तर लोकशाहीचे सौंदर्य नष्ट होईल”. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!