MaharashtraPoliticalNewsUpdate : अनिल देशमुख आरोप प्रकरणात नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले थेट आव्हान…
मुंबई : देशमुख – फडणवीस आरोपप्रत्यारोप प्रकरणात काँग्रेस आणि शिवसेनेने सुद्धा अनिल देशमुखांच्या बाजूने उडी घेतली आहे. फडणवीस हे ७.५ वर्ष गृहमंत्री पदावर आहेत, त्यांना या खात्याचा मोठा अनुभव आहे, त्यांच्याकडे काही व्हीडीओ व ऑडिओ क्लिप्स आहेत असा त्यांचा दावा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी आणि सत्य जनतेसमोर आणून संभ्रम दूर करावा अशी थेट मागणी पटोलेंनी केली आहे.
चार दिवसांपूर्वी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष म्हणून ओळख असलेले श्याम मानव यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. श्याम मानव यांनी केलेल्या आरोपानुसार, अनिल देशमुख यांना अजित पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ऑफर दिली होती पण त्याने ऑफर नाकरली म्हणून देशमुखांना इडीकडून खोटा आरोप करुन जेलमध्ये पाठवण्यात आले. दरम्यान श्याम मानव यांनी केलेले आरोप खरे असल्याचे सांगत अनिल देशमुखांनी फडणवीसांवरील आरोप खरे असल्याचे स्पष्टीकरण दिले.
दरम्यान अनिल देशमुख म्हणाले की , देवेंद्र फडणवीस यांचा जवळचा माणूस म्हणून ओळख असलेले समित कदम आपल्याकडे फडणवीसांची ऑफर घेवून आले होते, त्यांचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहे असा देशमुखांचा दावा आहे तर यावर फडणवीसांनी पलटवार करत आपल्याकडे सुद्धा पुरावे असल्याचा दावा केला आहे. अशातच आता नाना पटोले यांनी समित कदम यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहे. “सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना गरज नसतानाही पोलीस सुरक्षा दिलेली आहे. समित कदम हा सरकार आणि व्यापारी यांच्यातील मध्यस्थ व्यक्ती आहे म्हणून त्याला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे, ही जनतेच्या पैशाची लुट आहे” असे पटोले यांनी म्हणत समित कदम आणि फडणवीसांच्या मैत्रीपूर्ण नात्यावर भाष्य केले आहे.
हिम्मत असेल तर फडणवीसांनी वस्तुस्थिती मांडावी
दरम्यान मुंबईतील टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की , उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्याविरोधात खोट्या प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांवर दबाव आणला होता, अनिल देशमुख यांनी जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतरच सांगितले होते. मग कालपर्यंत देवेंद्र फडणवीस गप्प का बसले? देशमुख खोटे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही. फडणवीस, सरकारमध्ये असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करत होते, ज्यांनी फोन टॅप केले त्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालकपदी बढती दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धमकी देण्याऐवजी हिम्मत असेल तर वस्तुस्थिती मांडावी असा थेट टोला नाना पटोले यांनी लगावला.