AccidentNewsUpdate : नाशिक जवळ आयशर आणि कारच्या विचित्र अपघातात ४ ठार , २ जखमी
नाशिक : शुक्रवारी रात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावजवळ आयशर आणि कारचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव येथील दत्त मंदिरासमोर शुक्रवारी रात्री नाशिक बाजूकडून ओझरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला. त्यामुळे ओझरकडून आडगावकडे जाणाऱ्या कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली.
चार जणांचा मृत्यू, दोन जखमी
या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून आयशरचा चालक आणि क्लिनर हे दोघे जखमी झाले आहेत. यात ब्रेझा कार क्रमांक (एम. एच. 05 डी. एच. 9367) हिचा चक्काचूर झाला असून आयशर टेम्पो क्रमांक (एम. एच. 15 जी. व्ही. 9190) या आयशरचे ही नुकसान झाले आहे. अक्षय जाधव, सज्जू शेख, अरबाज तांबोळी आणि रहेमान तांबोळी, अशी मृतांची नावे आएत. मयत सर्व नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, अपघातानंतर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्तांना तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.