मुलीसाठी मुलगा बघायला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला , पाच जणांचा मृत्यू

चंदीगड : मुलीसाठी मुलगा बघायला जाणाऱ्या कुटुंबीयांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता या पाचही जणांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही घटना हरियाणाच्या हिसारमधून समोर आली आहे.
रविवारी हिस्सार-दिल्ली रोडवरील सेक्टर 27-28 जवळ, समोरून ट्रक आल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी तिघे पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील मोड मंडी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी 5 मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक मुलीच्या लग्नासाठी मुलगा पाहण्याकरता सिरसामार्गे हंसीला येथे येत होते. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गग्गड सिंग, रणजीत, रहिवासी मोड मंडी, सतपाल, मधु सिरसा येथील रहिवासी सतपाल आणि कालांवाली येथील रहिवासी रवि सिंह यांचा समावेश आहे. गग्गड सिंग आणि रणजित सिंग हे दोघेही सख्खे भाऊ होते, तर मधु गग्गड सिंगची पत्नी आणि सतपाल मधुचा भाऊ आहे.
प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, कार सेक्टर 27-28 वळणावर येताच समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक दिसला. धडक टाळण्यासाठी प्रयत्न करताना कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कालव्याच्या खड्ड्यात कार उलटली. . ज्याच्यामुळे हा अपघात झाला त्या ट्रक चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.असं सांगितलं जात आहे, की गग्गड सिंह आणि रणजीत कुटुंबातील एका मुलीसाठी मुलगा बघण्याकरता हंसीला येत होते. मात्र हंसीला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारला अपघात झाला. तपास अधिकारी अजायब सिंग यांनी सांगितलं की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्रकची ओळख अद्याप पटली नसून पोलीस चालकाची माहिती गोळा करत आहेत.