महाराष्ट्रासाह देशभरात आज 96 जागांवर मतदान, 8.97 कोटी पुरुष आणि 8.73 कोटी महिला मतदार बजावणार मतदानाचा हक्क ….
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी देशभरात सोमवारी म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार आहे. 19 एप्रिलपासून सुरू झालेल्या निवडणुकीत आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील (UT) 96 जागांवर मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील 25 जागांसाठी, बिहारमधील 40 पैकी पाच जागांसाठी, झारखंडमधील 14 पैकी 4 जागांसाठी, मध्य प्रदेशातील 29 पैकी 8 जागांसाठी आणि महाराष्ट्रात 48 पैकी 11 जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय ओडिशातील 21 पैकी 4 जागांसाठी, तेलंगणातील 17 पैकी 17 जागांसाठी, उत्तर प्रदेशातील 80 पैकी 13 जागांसाठी, पश्चिम बंगालमधील 42 पैकी 8 जागांसाठी आणि जम्मू काश्मीरमधील पाचपैकी एका जागेसाठी मतदान होणार आहे.
चौथ्या टप्प्यात, तीन राज्यांमध्ये मतदान पक्ष आणि सुरक्षा दलांना दुर्गम ठिकाणी नेण्यासाठी हेलिकॉप्टरची १२२ उड्डाणे निश्चित केली असून यामध्ये आंध्र प्रदेशात 2, झारखंडमध्ये 108 आणि ओडिशात 12 उड्डानांचा समावेश आहे.
8.97 कोटी पुरुष आणि 8.73 कोटी महिला मतदार आहेत
या टप्प्यात आंध्र प्रदेश विधानसभेच्या 175 जागांवर आणि ओडिशा विधानसभेच्या 28 जागांवरही मतदान होणार आहे. या टप्प्यात 1 लाख 92 हजार मतदान केंद्रांवर 17.7 कोटी मतदार मतदान करतील आणि 1717 उमेदवारांमधून त्यांच्या पसंतीचा प्रतिनिधी निवडतील. या कामासाठी 19 लाख मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एकूण मतदारांपैकी 8.97 कोटी पुरुष आणि 8.73 कोटी महिला मतदार आहेत.
८५ वर्षांवरील 12.49 लाख मतदार
एकूण 17.7 कोटी मतदारांपैकी 12.49 लाख मतदार 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी 364 निरीक्षक आणि 4661 उड्डाण पथके आहेत. याशिवाय 4438 स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमही मतदारसंघात असतील. दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या या मतदारसंघांमध्ये 1016 आंतर-राज्य सीमा आणि 121 आंतर-राष्ट्रीय सीमा चेक पोस्ट आहेत.
एकूण जागा आणि उमेदवारांच्या आधारे, प्रत्येक प्रदेशात सरासरी 18 उमेदवार आहेत. म्हणजे अनेक मंडळांमध्ये दोन बॅलेट युनिट बसवावे लागणार आहेत. कारण एक बॅलेट युनिट 16 उमेदवारांना मतदान करू शकते. तर एक ईव्हीएम 64 उमेदवारांची मते नोंदवू शकतो. एका ईव्हीएममध्ये 2000 मते नोंदवता येतात.
तेलंगणात मतदानाची वेळ वाढवली
दरम्यान आज होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट येणार नाही आणि तापमान सामान्यपेक्षा किंचित कमी राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तरीही तेलंगणामध्ये अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी एक तासाने वाढवली आहे. आयोगाने यापूर्वीही अनेक राज्यांमध्ये आयोगाने अशी वेळ वाढवून दिली आहे.
