Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पँथर नेते माजी मंत्री गंगाधर गाडे काळाच्या पडद्याआड, उद्या अंत्यसंस्कार

Spread the love

औरंगाबाद : आंबेडकर चळवळीतील अग्रणी नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री  गंगाधर सुखदेव गाडे (७६) यांचे आज सकाळी ४.३० वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक ५ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यददर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच दुपारी ४ वाजता अंत्यविधी केला जाणार आहे.

गाडे यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच शहरातील अनेक नेते, कार्यकर्ते यांची त्यांच्या निवासस्थानकडे धाव घेतली होती. माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनीही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी सौ सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे.

गंगाधर गाडे यांचा अल्प परिचय

गंगाधर गाडे यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९४७ रोजी कवठाळ तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथे झाला होता. दहावीनंतर ते १९६५ ला मिलिंद महाविद्यालयात आले होते. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना नेतृत्वाची आवड होती. विद्यार्थी चळवळीतील आंदोलनानंतर १९७२-७३ मध्ये त्यांनी दलित पँथर मध्ये राजा ढाले यांचे नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली.

शहरातील बहुतेक मागासवर्गीय वसाहती त्यांनी वसविल्या होत्या. आंबेडकरी चळवळीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांचा मोठा सहभाग होता. आणीबाणीच्या काळात त्यांना आठ महिने तुरुंगवासही भोगावा लागला होता. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त केल्यानंतर १९९१ मध्ये त्यांनी भारतीय दलित पँथरच्या स्थापनेत पुढाकार घेतला.

१९९९ मध्ये त्यांना परिवहन राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली होती त्या काळात त्यांनी एसटी साठी उल्लेखनीय कार्य केले. सध्या ते पँथरस रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापना करून शैक्षणिक कार्य केले आहे. सध्या त्यांच्या पत्नी सूर्यकांता गाडे मुलगा सिद्धांत गाडे आणि सून भावना गाडे या शिक्षण संस्थेची धुरा सांभाळत आहेत.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!