Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Interim Budget 2024 Updates: अर्थसंकल्पावर कोण काय म्हणाले ? विरोधी पक्षाकडून टीका तर सत्ताधाऱ्यांकडून स्वागत ..

Spread the love

मुंबई : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना आपल्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर  विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पावर आपल्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत तर सत्ताधारी नेत्यांनी अर्थसंकल्पाचे स केल आहे.  वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून म्हटले आहे की , हे सरकार केवळ ज्ञान देतंय. पण, भारतीय युवा, गरिब, महिला आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. वित्त मंत्र्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोटे बोलण्यात धन्यता मानली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावरून सरकारला पुढील तीन प्रश्न विचारले आहेत.

1. जर अर्थव्यवस्था चांगली असेल, तर मागच्या 9 वर्षांत 12,88,293 अती श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांनी देश का सोडला? ”वायब्रंट गुजरात” मधील 7,25,000 लोकांनी बेकायदेशीर रित्या अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न का केला?
2. वास्तविक सरासरी उत्पन्नात 50% वाढ झाली या माहितीचा स्त्रोत काय?
3. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती शंकास्पद आहे.

हे सगळे जादूचे प्रयोग : उद्धव ठाकरे यांची टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या बजेटवर टीका केली आहे. शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. गरीब, महिला, तरुण, शेतकरी या जातीसाठी काम करणार असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या हे धाडस त्यांनी केलं त्यांचे अभिनंदन. तुमच्या पंतप्रधानांच्या मित्रापलीकडेही देश आहे हे आता 10 वर्षानंतर कळले. महिलांबद्दल तुम्ही बोलताय मग सीतारामन जी तुम्ही मणिपूरकडे का जात नाहीत? बिलकीस बानूकडे जा? सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही शेतकऱ्यांना अतिरेकी समजत होतात आता त्यांच्याबद्दल बोलताय. हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहे. अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता महिलांना फुकट सिलेंडर देतील. तरुणांना नोकऱ्या देणार असे म्हटले मग 10 वर्ष काय केले?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

अंतरिम नव्हे अंतिम अर्थसंकल्प : विजय वडेट्टीवार

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा अंतरिम नसून अंतिम अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज केंद्र सरकारने सादर केला आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवास्वप्न दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

‘खोदा पहाड निकला चुहा : काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

आजचा अर्थसंकल्प हा निराशाजनक असल्याचे काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. या अर्थसंकल्पात व्यावसायिकांना सवलती दिल्या गेल्या नाहीत. महागाई आणि त्याबाबत काही उपाययोजना या अर्थसंकल्पातून झाल्या नाहीत. खोदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अंतरिम बजेटमधून सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना काहीच मिळालेलं नाही – राजू शेट्टी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. या बजेट मधून सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना काहीच मिळालेलं नाही त्यामुळे हे बजेट निराशा जनक असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. पाहुयात राजू शेट्टी काय म्हणाले आहेत.

2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्पातील रेकॉर्डवरील सर्वात लहान भाषणांपैकी हे एक होते. त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही,असं त्यांनी म्हटलं आहे.

विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले, आभार मानले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषत: महिला, शेतकरी, गरिब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे.

अर्थसंकल्प विकसित भारताच्या 4 स्तंभावर आधारीत- पंतप्रधान मोदी

हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे. त्यात सातत्याचा विश्वास आहे. हा अर्थसंकल्प युवा, गरीब, महिला आणि किसान या 4 स्तंभांना सक्षम करेल. हा अर्थसंकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची हमी देतो. या अर्थसंकल्पात तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. अर्थसंकल्पात दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नवकल्पना यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!