IndiaNewsUpdate : कुस्तीपटू विनेश फोगटनेही आपले पुरस्कार कर्तव्य पथवर सोडून केला निषेध …
नवी दिल्ली : आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विनेश फोगट हिने महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ आपले पुरस्कार परत केले आहेत. शनिवारी (३० डिसेंबर) नवी दिल्लीतील कर्तव्य पथवरआपले पुरस्कार ठेऊन दिले. विनेश फोगट पुरस्कार परत करण्यासाठी पीएमओमध्ये जात असताना पोलिसांनी तिला अडवले. यानंतर तिने कर्तव्य पथवर पोलिसांच्या समक्ष आपला पुरस्कारठेऊन दिला. फोगट यांनी तीन दिवसांपूर्वीच आपला पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती.
युवक काँग्रेसने ही घटना देशासाठी लाजिरवाणी दिवस असल्याचे म्हटले आहे. युवक काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, “देशासाठी हा लाजिरवाणा दिवस आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर देशासाठी पदक जिंकणारी मुलगी विनेश फोगट हिने आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाबाहेर ठेवले आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने त्यांच्यावर इतका अत्याचार केला की आज त्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे.
पीएम मोदींना पत्र लिहिले
तत्पूर्वी, भारतीय कुस्ती महासंघ (WFI) संदर्भात सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले होते, ज्यामध्ये तिने संपूर्ण घटनेबद्दल आणि WFI चे नवीन अध्यक्ष संजय सिंह यांच्या निवडीबद्दल निराशा व्यक्त केली होती. पत्रात विनेश फोगटने महिला कुस्तीपटूंना न्याय न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली होती आणि ती अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले होते.
बजरंग पुनिया यांनीही पद्मश्री परत केली
याआधी कुस्तीपटू बजरंग पुनियानेही आपला पद्मश्री पुरस्कार परत केला होता आणि त्याचा निषेध म्हणून त्याने कर्तव्य पथाच्या फूटपाथवर आपला पुरस्कार असाच रस्त्यावर सोडला होता. त्याचवेळी साक्षी मलिकने पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित WFI पॅनलच्या निषेधार्थ निवृत्ती घेतली होती.
ब्रिजभूषण शरण सिंह यांचा निषेध
अनेक महिला कुस्तीपटूंनी माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप लावले होते, त्यानंतर विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अनेक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण विरोधात अनेक महिने विरोध केला होता.