CyberCrimeNewsUpdate : ऑनलाईन वर्क फ्रॉम होमचा जॉब शोधताय ? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे ….

मुंबई : गुगलवर ऑनलाईन काम शोधात असाल तर सावध व्हा ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण नोकरी आणि वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी गजाआड केले आहे. या दोघांनाही वर्क फ्रॉम होम करुन लाखो रुपये कमवा असे प्रलोभन दाखवीत लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांत आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांमध्ये ६० कोटींहून अधिकचे व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या खात्यांमधील एक कोटी रुपये पोलिसांनी गोठवले आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. रुपेश ठक्कर आणि पंकज भाई ओड अशी या आरोपींची नावे असून त्यांना गुजरातमधील गांधीनगर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून फसवणुकीसाठी वापरलेले अनेक फोन आणि बँक खातीही जप्त करण्यात आली आहेत.
अशी झाली फसवणूक
अधिक माहितीनुसार वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या ( व्हीजेटीआय ) वसतिगृहात राहणारा एक १९ वर्षीय विद्यार्थी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून यांच्या संपर्कात आला होता. त्यात त्याची फसवणूक झाल्याची तक्रार या विद्यार्थ्याने केली होती.त्याला पार्टटाइम कामाचे आमिष दाखवीत एका टेलिग्राम चॅनेलमध्ये घेण्यात आले. नंतर फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना चांगल्या रिटर्नचे आश्वासन देऊन वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले.आणि तो फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला . त्याने त्यांच्या खात्यात २लाख ४५ हजार रुपये जमा केले. परंतु त्याला कुठलाही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
असा लागला सुगावा…
दरम्यान या विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यात त्याने कोणत्या बँक खात्यात पैसे जमा केले होते, याची माहिती दिली होती त्यानुसार पोलिसांनी या खात्यांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान आरोपींची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक गांधीनगर, गुजरात येथे पोहोचले आणि तेथून रुपेश ठक्कर (33) आणि पंकज भाई ओड (34) यांना ताब्यात घेतले. या तपासात पोलिसांनी आरोपींकडून ३३ डेबिट/क्रेडिट कार्ड, विविध बँकांची ३२ चेकबुक, सहा मोबाईल फोन आणि २८ सिमकार्ड जप्त केले आहेत. या आरोपींविरुद्ध आयपीसी कलम ४२० (फसवणूक) आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.