SharadPawarNewsUpdate : शरद पवार यांचा उद्या नवी मुंबईत मेळावा , कार्यकर्त्यांना उत्सुकता
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार रविवारी नवी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी ते नेरूळ येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते संवाद साधतील. या मेळाव्यात नवी मुंबई राष्ट्रवादीतर्फे बचत गटाच्या महिलांना विशेष स्थान असून ३०० गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष जी. एस. पाटील यांनी दिली.
या मेळाव्याच्या नियोजनाकरिता नवनिर्वाचित अध्यक्ष व माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला जी. एस. पाटील, माजी नगरसेवक राजू शिंदे, संदीप सुतार यांच्यासह नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, मेहबूब शेख आदी मुख्य नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे.
पक्षात झालेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच येणार असल्याने शरद पवार कोणाचा समाचार घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीची नवी मुंबई शहराची नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. येणाऱ्या काळातील विधानसभा, लोकसभा आणि मनपा निवडणुका या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून ताकद आजमावली जाणार आहे.