AccidentNewsUpdate : भीषण अपघातात न्यायाधीशासह चालक ठार

बीड : बीड येथील जिल्हा न्यायालयात दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) म्हणून कार्यरत असलेले उद्धव वसंतराव पाटील (३५, रा. अजनसोंडा, ता. चाकूर, जि. लातूर) यांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरून जोराची धडक दिल्याने न्या. पाटील यांच्यासह चालक बळी टमके या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर-उदगीर मार्गावरून आष्टामोडकडे जात असताना सेवादार तांडाजवळ शुक्रवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. शनिवार, रविवार दोन दिवस सुटी असल्याने न्या. पाटील हे गावी निघाले होते.
शुक्रवारी काम आटोपून रात्री उशिरा गावी अजनसोंडा येथे जाण्यासाठी न्या.पाटील कारने (एमएच १७, बीव्ही १२५७) निघाले होते. बळी नंदकुमार टमके (रा. अंजनसोंडा) हा कार चालवत होता. रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान कार रेणापूर-उदगीर मार्गावरून आष्टामोडकडे जात असताना सेवादार तांडाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली. यात कारचा चेंदामेंदा झाला होता. न्या. पाटील यांच्या कारचा अपघात इतका भीषण होता की, कार सुमारे १०० फूट घासत गेली.
कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याने न्या. पाटील व कारचालक टेमके दोघेही कारमध्ये अडकले होते. तांड्यावरील नागरिकांना त्यांना कारबाहेर काढण्यासाठी दीड तासाचा वेळ लागला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. या वेळी झालेल्या आवाजाने तांड्यावरील नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी न्या. पाटील व कारचालकाला बाहेर काढून रेणापूर ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
बीड येथील न्यायालयात उद्धव वसंत पाटील हे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) म्हणून कार्यरत होते. लातूर जिल्हा न्यायालयात वकिली करताना त्यांनी स्पर्धा परीक्षेतून यश मिळवले होते. वर्षभरापूर्वीच त्यांची या पदावर निवड झाली होती.