MumbaiNewsUpdate : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा आज भारत मोठी स्वप्न पाहत आहे : नरेंद्र मोदी
मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा आज भारत मोठी स्वप्न पाहत असून ती पूर्ण करण्याची हिम्मत करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी मुंबईतील बीकेसीवरील मैदानातील सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आधुनिक वाहतूक व्यवस्था, जगभरात भारताबद्दल बदलेली भूमिका, पीएम स्वनिधी योजना, डिजीटल इंडिया, डबल इंजिन सरकार, बुलेट ट्रेन, मेट्रो, मुंबई लोकल आदी मुद्यांवर भाष्य केले.
यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणातून एक प्रकारे मुंबई महापालिकेच्या प्रचााराचा शुभारंभ केला आहे. दरम्यान डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे, असे त्यांनी म्हटले असून आज मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरु आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला देखील यातून फायदा होत आहे. ते म्हणाले, ”डबल इंजिन सरकारला सामान्य माणसालाही तीच आधुनिक सुविधा, तीच स्वच्छता आणि त्याच विकासाच्या गतीचा अनुभव द्यायचा आहे, जो कधी फक्त साधन संपन्न लोकांना मिळत होता. यासाठी आज रेल्वे स्थानकांनाही विमानतळासारखं विकसित केलं जात आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील पुनर्विकास केला जात आहेत.” देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. तसेच मुंबईला भविष्यासाठी तयार करणं, ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
”देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा आज भारत मोठी स्वप्न पाहत असून ती पूर्ण करण्याची हिम्मत करत आहे. याआधी आपल्याकडे एक मोठा काळ फक्त गरीबीची चर्चा करणं, जगाकडून मदत मागणं, यावर वेळ घालवत गेला आहे. ते म्हणाले, ”स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे पहिल्यांदा होत आहे, ज्यात जगाला भारताच्या संकल्पेनेवर विश्वास होत आहे.” ते म्हणाले, ”आज सगळ्यांना असं वाटत आहे की, भारत ते करत आहे जे गतिशील विकासासाठी आवश्यक आहे.”