Maharashtra political update : मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव….

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाला बोलू दिले जात नसल्याचा आरोप करीत महविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल कण्याबाबताचे पत्र विधिमंडळ सचिवांना दिले असल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकार विरोधात सभागृह दणाणून सोडले आहे. या धामधुमीत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचे सदस्यत्व अधिवेशन कालावधीत निलंबित केले असल्याने विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या हल्ल्यात आता महाविकासआघाडीने हे मोठे पाऊल उचलले आहे. मविआच्या नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे आता यावर विधानसभा सचिव राजेंद्र भागवत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसचे आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभा सचिवांकडे अविश्वास प्रस्तावाबाबतचे हे पत्र दिले आहे. या पत्रावर महाविकासआघाडीच्या ३९ आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. अधिवेशनाचा एकच दिवस शिल्लक असताना महाविकासआघाडीने घेतलेल्या या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा आहे. विरोधी पक्षातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकविरोधात आणि सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची परवानगी मागूनही नाकारण्यात आल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे.