MaharashtraNewsUpdate : आरोग्य मंत्र्यांची कामगिरी , अवघ्या दोनच महिन्यात तुकाराम मुंढे यांची आरोग्य खात्यातून उचल बांगडी …

मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाली असल्याचे वृत्त आहे . गेल्या दोन महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवा आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली होती. या दोन महिन्याच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र दौरे काढून आरोग्य खात्यात खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या कडक शिस्तीमुळे अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. दरम्यान असे सांगण्यात येते कि, त्यांच्या कारभाराने त्रस्त झालेल्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर दबाव आणून अवघ्या दोनच महिन्यात त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. दरम्यान मुंढे यांना कोणत्या विभागात नियुक्ती दिली याची माहिती अद्याप समोर आली नाही.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुकाराम मुंढे यांच्यावर आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. डॉ. रामस्वामी एन. यांच्याकडून मुंढे यांनी पदभार स्वीकारला होता. तसेच, त्यांच्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचीही जबाबदारी होती. पण, दोन महिन्यातच मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह सहा आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात दौरे करुन रुग्णालयाची पाहणी केली होती. या दौऱ्यात मुंढे यांनी बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून ही बदली केली असल्याचे वृत्त आहे.
या सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
दरम्यान राज्यातील ज्या सहा सनदी अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या त्यामध्ये डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, आयुक्त उत्पादन शुल्क, भाग्यश्री बानायत, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, विनय सदाशिव मून, सीईओ , परभणी जिल्हा परिषद, एस. एम. कुर्तकोटी, सीईओ , भंडारा जिल्हा परिषद, सौम्या शर्मा, सीईओ , नागपूर, जिल्हा परिषद , एम. एस. चव्हाण , आयुक्त कृषी , पुणे यांचा समावेश आहे.