Bilkis Bano Case: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या सुटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालायात पुनर्विचार याचिका
नवी दिल्ली : २००२ च्या गुजरात दंगलीतील सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांच्या निर्दोष सुटकेला बिल्किस बानोने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बिल्किस बानो यांनी दोषींच्या सुटकेविरोधात दोन याचिका दाखल केल्या आहेत.
यातील पहिल्या याचिकेत ११ दोषींच्या सुटकेला आव्हान देण्यात आले असून या सर्वांना तात्काळ तुरुंगात पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या मे महिन्याच्या आदेशावरील पुनर्विलोकन याचिका आहे. या याचिकेत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयावर पुनर्विचार करावा, ज्यात गुजरात सरकार दोषींच्या सुटकेचा निर्णय घेईल, असे म्हटले होते. यासाठी योग्य सरकार महाराष्ट्र सरकार असल्याचे बिल्किसने म्हटले आहे. कारण या खटल्याची सुनावणी महाराष्ट्रात सुरू होती.
सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणीही बिल्किसच्या वतीने करण्यात आली आहे. सीजेआय डीवाय चंद्रचूड यांनी या प्रकरणी सुनावणी कधी करता येईल ते पाहू, असे आश्वासन दिले. दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी करता येईल का, या मुद्द्यावर ते तपासणार असल्याचे सीजेआयने म्हटले आहे. त्यांची एकाच खंडपीठासमोर सुनावणी होऊ शकते का?
२००२ च्या दंगलीत जेव्हा बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला तेव्हा ती २१ वर्षांची होती. एवढेच नाही तर हल्लेखोरांनी तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह तिच्या कुटुंबातील नऊ जणांची हत्या केली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी बिल्किसच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.