Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GovernerNewsUpdate : राज्यपालांच्या विधानावरून छत्रपती संभाजी राजे संतापले , घाणेरडे विचार मांडणारा राज्यपाल आम्हाला नकोय …

Spread the love

https://www.youtube.com/watch?v=zUAsDYKrw2M

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते. तर, तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.त्यांच्या या विधानावरून संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती करतो, असे खडे बोल संभाजीराजेंनी सुनावले आहेत.


आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून संभाजीराजेंनी तीव्र शब्दांत भाष्य केले आहे.

राज्यपाल असे का बडतात मला माहिती नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असे मी परवा सुद्धा म्हटले होते. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? महाराष्ट्राचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसे शकते. यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसे? अशी संतप्त विचारणा संभाजीराजे यांनी केली आहे.

श्रीमंत कोकाटे यांच्याकडूनही निषेध

दरम्यान, लेखक आणि इतिहास तज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. राज्यपाल हे नेहमी संदर्भहिन बोलतात, वादग्रस्त बोलतात आणि अपमानजनक बोलतात. राज्यपाल पदाची प्रतिष्ठा गमावलेली व्यक्ती म्हणजे कोश्यारी. शरद पवार आणि नितीन गडकरी कर्तृत्ववान आहेतच. त्याच्याबद्दल आदर आहेच. पण राजपालांनी महाराजांचा उपमर्द केला, असे श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली. या पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आले.

शरद पवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये शैक्षणिक कामात प्रगती नसतांना येथे लक्ष घातले आणि मिलिंदच्या माध्यमातून शिक्षण दिले. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे विद्यापीठ आहे. याच्या निर्मितीपासूनचा कालखंड मला आठवतो. याच्या जडणघडणीत माझा समावेश होता याचा आनंद आहे. आज विद्यापीठाने डिलीट पदवी प्रदान केली यासाठी अंतकरणापासून आभारी आहे. नितीन गडकरी आणि माझ्या कामाची दखल घेतली गेली यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. या विद्यापीठाच्या स्थापनेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे. या भागात विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय नेतृत्वाने घेऊन संपूर्ण मराठवाड्याच्या शिक्षणाचे दालन खुले झाले. विद्यापीठासाठी संघर्ष झाला. याचा भागात आणखी एक विद्यापीठ स्थानक करण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता याचा आनंद आहे. यामुळे येथे शैक्षणिक दालन खुले झाले, या शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यातून तीव्र प्रतिक्रिया

राज्यपालांच्या या विधानावर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात मनसेनेही राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवण्याची वेळ आलीय अशा शब्दात मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे. प्रवक्ते गजानन काळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी परत माती खाल्ली, परत त्यांचा तोल गेला. ज्या विषयामधलं राज्यपालांना कळतं नाही तिथं का ज्ञान पाजळता? राज्यपालांनी सुधारायचं नाही अस ठरवलेलं दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी निश्चित घ्यावा पण छत्रपती शिवरायांशी तुलना नको. छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ,वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा, छत्रपती संतापले

पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील, संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? महाराष्ट्राचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसे शकते. यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसे? अशी संतप्त विचारणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!