JitendraAvhadNewsUpdate : हर हर महादेव … आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना जामीन …
ठाणे : ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांसह इतरही १२ जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. कालच्या अटकेनंतर आव्हाडांना आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दुपारी जामिनासंदर्भात झालेल्या सुनावणीत आव्हाडांसह इतर १२ जणांना जामीन मिळाला आहे.
ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा आव्हाडांनी प्रयत्न केला होता. याच प्रकरणावरुन आव्हाडांसह १२ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. काल सायंकाळी ४ वाजता आव्हाडांना अटक झाली होती. दरम्यान आज सकाळी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि ११ कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टामध्ये हजर केले होते.
आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी
दरम्यान आव्हाड यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येत होत्या. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. तसेच पोलिसांकडून कोर्टाच्या दिशेने येणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आले होते.
दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या निर्णयानंतर आव्हाडांनी तत्काळ जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांसह इतरही १२ जणांना जामीन मंजूर केला.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
दरम्यान आव्हाडांना जामीन मंजूर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. तर आव्हाड कोर्टाबाहेर येताच त्यांच्या गाडीवर फुलांची उधळण करण्यात आली. गुलाब पुष्पाच्या पाकळ्यांच्या वर्षावात आव्हाडांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. कार्यकर्त्यांच्या उत्साहात आव्हाडही सामील झाले. त्यांनीही कार्यकर्त्यांच्या घोषणबाजीत सूर मिसळला. “तुमचं माझं नातं काय? जय भवानी जय शिवराय… जय जय जय जय जय भीम…”, अशा गगनभेदी घोषणांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा परिसर दुमदुमून गेला.
काय प्रकार घडला होता ?
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने बाहेर लावल्याने वादाचे प्रसंग घडला. यात कार्यकर्ते आणि प्रेक्षक यांच्यात झटापट झाली. यामध्ये एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. या प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
JitendraAvhadNewsUpdate | JitendraAvhadNewsUpdate | JitendraAvhadNewsUpdate | JitendraAvhadNewsUpdate | JitendraAvhadNewsUpdate
News Update | जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी