BacchuKaduV/sRavianaUpdate : दोन आमदारातला वाद भडकला , दोघांचेही परस्परांना निर्वाणीचे इशारे ….

मुंबई : मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्ती केल्यानंतर त्यांना आ . बच्चू कडू आणि आ. रवी राणा यांचे भांडण मिटेल अशी आशा होती परंतु त्यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी अधिक भडकला आहे. शिंदे – फडणवीस सरकारसाठी हा वाद नक्कीच डोकेदुखी ठरणारा आहे.
आपल्या नेत्याच्या सल्ल्यानंतर राणा यांनी आढेवेढे घेत पत्रकारांसमोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपले वक्तव्य आपण मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. याउलट बच्चू कडू यांनी मात्र आपण आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर बोलू असे म्हटले होते. शेवटी एक जाहीर सभा घेत कडू यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. मात्र कडू यांचे सभेतील वक्तव्य ऐकताच राणा यांनी पुन्हा एकदा आपली संतप्त प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांच्यावर प्रहार केले आहेत.
बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात “ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो. पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही”, असा इशारा देत राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा विषय माझ्यासाठीही संपला असल्याचेही जाहीर केले होते. पण पुन्हा एकदा कडू यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना , ‘कुणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे,’ असा इशारा बच्चू कडू यांना दिला होता. त्यावर शांत न बसता “रवी राणांनी तलवार घेऊन यावे, मी फुल घेऊन तयार आहे. त्यांना किती तुकडे माझ्या शरीराचे करायचे आहेत, त्यांनी सांगावे. मी हात सुद्धा लावणार नाही. त्यांनी तारीख सांगावी, मी मरण्यासाठी तयार राहतो. कोणत्या चौकात येऊ हे सुद्धा बोलावे. प्रहारच्या सभेत बोलताना कोणाचेही नावं घेतलं नव्हतं,” असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
दोघांचाही एकमेकांना निर्वाणीचा इशारा
दरम्यान “राणांच्या वक्तव्याची दखल घ्यावी वाटत नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. मी निवडून यायचं की नाही, हे जनता ठरवेल,” असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवी राणा म्हणाले की, “मी स्वत: पुढे येऊन वाद मिटवलेला आहे. पण, एक लक्षात ठेवा, कुणी जर मला दम देत असेल, तर ते सहन करणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देखील रवी राणा घाबरलेला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. मात्र, कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे,” असा इशारा रवी राणांनी बच्चू कडूंना दिला होता.
बच्चू कडू यांनी आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात “पुन्हा वैयक्तिक आरोप केल्यास कोथळा बाहेर काढू…” असा इशारा दिल्यानंतर आज रवी राणांनीही आक्रमक वक्तव्य केले. इतकेच नव्हे “बच्चू कडू पुन्हा आमदार कसा होणार ते पाहा…” असे आव्हानच राणा यांनी दिल्यानंतर हा वाद पुन्हा चिघळला आहे.
कार्यकर्त्यांना कडू यांचा सबुरीचा सल्ला…
दरम्यान रवी राणांच्या आव्हानाचा समाचार घेताना बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, ‘घरात घुसून मारू, निवडणुकीत पाडू, असे आव्हान रवी राणा यांनी दिल्याचे मी मीडियावर पाहिले. रवी राणा यांना मला मारायचे असेल तर मी ५ तारखेला घरी आहे. तेव्हा त्यांनी तलवार घेऊन माझ्या घरी यावे. मी मार खायला तयार आहे. मी राणा यांच्या तलवारीचा वार छातीवर झेलेन,’ एकीकडे राणा यांना आव्हान देत असताना बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मात्र शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
‘मला आता हा वाद वाढवायचा नाही. कारण या वादात शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न मागे पडत आहेत. आता आपण यामध्ये अडकून पडलो तर हे प्रश्न मागे राहतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. माझ्या बाजूने वाद संपला आहे. मात्र तरीही राणा यांना माझ्यावर हल्ला करायचा असेल तर त्यांनी माझ्या घरी यावे. मी माझे रक्त वाहून द्यायला तयार आहे,’ असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे शिंदे – फडणवीस सरकारचे समर्थक रवी राणा आणि बच्चू कडू या दोन आमदारांचे भांडण मिटावे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही आमदारांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र या बैठकीला काही तास उलटताच पुन्हा एकदा राणा-बच्चू कडू वाद चिघळल्याने शिंदे -फडणवीस सरकारची डोकेदुखी या वादामुळे वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
काय म्हणाले रवी राणा ?
“हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. बच्चू कडू जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.
“प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एकदा नाही, तर दहादा माघार घायला तयार आहे. पण कोणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमतही माझ्यात आहे”, अशा इशाराही त्यांनी बच्चू कडू यांना दिला. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच मी माघार घेतली होती. कोणाचेही मन दुखायला नको, त्यामुळे हा वाद मिटवण्याचा मी प्रयत्न केला. पण वारंवार कोणी मला दम देत असेल, तर मलाही उत्तरं देता येतात”, असेही ते म्हणाले.