Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसकडून टीकास्त्र …

Spread the love

मुंबई : आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींसोबतच भगवान श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी करताच काँग्रेसकडून त्यांच्या या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया आली आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याचा आरोप करण्यात येत आहे.


नोटांवर एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी गणेशजींचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपली अर्थव्यवस्था रूळावर येईल, असे ‘लॉजिक’ केजरीवाल यांनी मांडले. केजरीवालांच्या या विधानावरुन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , डॉ. नितीन राऊत आणि सचिन सावंत यांनी केजरीवालांविरुद्ध आपल्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

देशवासियांची फसवणूक करण्यात आहे…

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “केंद्र सरकार आणि केजरीवाल देशवासीयांची फसवणूक करत आहे”, अशी टीका केली आहे. “आपल्याला माहिती आहे, की देशाचा रुपया संपायला आलेला आहे. मात्र, आज ज्या पद्धतीने रुपयांची घसरण सुरू आहे, ती वाचवणं गरजेचं आहे. ही मागणी ज्या व्यक्तीने केली आहे. ती व्यक्ती उच्चशिक्षित आहे. त्यांना या विषयाची जाण आहे. मात्र, मतांच्या राजकारणासाठी यापद्धतीने मागणी करत धार्मीक वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. एकंदरीत केंद्र सरकार आणि केजरीवाल देशवासियांची फसवणूक करण्यात आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

डॉ. नितीन राऊत यांची टीका

डॉ. नितीन राऊत यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना धर्माची नशा विकण्याचे काम केजरीवाल करत असल्याचे म्हटले. केजरीवाल आणि मोदींमध्ये फारसा फरक नाही, असेही ते म्हणाले. तसेच, देशातील चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापण्याची मागणी केली. तसेच, बाबासाहेबांचा फोटो का नाही, असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.

केजरीवाल अन् मोदींमध्ये काही खास फरक नाही…

अरविंद केजरीवाल ज्या शाळांचे ब्रँडींग करतात, त्या शाळेत त्यांनी जायलाही हवे. थोडा अभ्यासही करायला हवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या सिद्धांतांना समजून घ्यायला हवे. मग, धर्मांची नशा विकण्याची गरज पडणार नाही. धर्माची नशा करणारे हे नेते मूर्ख नसून चालाख आहेत. केजरीवाल अन् मोदींमध्ये काही खास फरक नाही. दोघेही संविधानविरोधी आणि धार्मिक रुपाने पाखंडी आहेत. धार्मिक अफीमची ठेकेदारी करणारे अरविंद केजरीवाल असोत, आरएसएस  किंवा बीजेपी असो, हे नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि महात्मा गांधींच्या सिद्धांताचा अवमान करतात, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

कुबेरजींना सोडून दिले का ? : सचिन सावंत

दरम्यान या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केजरीवाल यांना खोचक प्रश्न केला आहे.”कुबेरजींना सोडून दिलं का? भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मीमाता कशा खूश राहणार? आणि नवग्रह? तुम्ही जय श्रीरामचा नारा देता आणि भगवान श्रीरामाला विसरलात? सीतामाता, हनुमानजी नसतील तर अर्थव्यवस्था कशी सुधारणार?” असे प्रश्न सचिन सावंत यांनी ट्विटरवर उपस्थित केले आहेत. “पण या नोटा कत्तलखाने, मांसाहारी हॉटेल, मासळी बाजार आणि बारमध्येही जाणार. मग आपण काय करणार केजरीवालजी?” असाही प्रश्न सचिन सावंत यांनी ट्विटरवर केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!