MaharashtraDasaraSpecial : महाराष्ट्रात एक गाव असे आहे कि , जेथे रावणाचे दहन नाही तर पूजा होते ….

अकोला : आपल्या सर्वांना माहित आहे कि , विजयादशमीला देशभरात रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते, परंतु महाराष्ट्रात असे एक गाव आहे की, जिथे दसरा हा सण थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि येथे रावणाचे दहन नाही तर आरती केली जाते.
अकोला जिल्ह्यातील सांगोला गावातील अनेक रहिवाशांचा अशी श्रद्धा आहे की रावणाच्या आशीर्वादामुळे त्यांना नोकरी मिळते आणि आपला उदरनिर्वाह चालवता येतो आणि आपल्या गावात शांतता आणि आनंद रावामुळे आहे. रावणाच्या ‘बुद्धी आणि तपस्वी गुणांसाठी’ त्याची पूजा करण्याची परंपरा गेल्या ३०० वर्षांपासून गावात सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गावाच्या मध्यभागी १० डोकी असलेली रावणाची उंच काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
स्थानिक रहिवासी भिवाजी ढाकरे यांनी बुधवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर सांगितले की, गावकरी प्रभू रामाला मानतात, पण रावणावरही विश्वास ठेवतात आणि त्याचा पुतळाही जाळला जात नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की, या छोट्या गावात दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी लंकेच्या राजाची मूर्ती पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात आणि पूजाही करतात.
सांगोला येथील रहिवासी सुबोध हातोळे म्हणाले, “महात्मा रावणाच्या आशीर्वादाने आज गावात अनेकांना रोजगार मिळाला आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण महा-आरती करून रावणाच्या मूर्तीची पूजा करतो. तर ढाकरे म्हणाले की काही गावकरी रावणाला “विद्वान” मानतात आणि त्यांना वाटते की त्याने “राजकीय कारणांसाठी सीतेचे अपहरण केले आणि तिची पवित्रता राखली”.
स्थानिक मंदिराचे पुजारी हरिभाऊ लकडे म्हणाले की, देशातील उर्वरित भागात दसऱ्याला रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते, जे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविते, मात्र सांगोला येथील आम्ही सर्व रहिवासी “बुद्धी आणि तपस्वी गुणांसाठी” लंकेच्या राजाची पूजा करतात. ते पुढे म्हणाले कि , त्यांचे कुटुंब दीर्घकाळापासून रावणाची पूजा करत आहे आणि लंकेच्या राजामुळे गावात सुख, शांती आणि समाधान असल्याचा दावा केला.