Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : राज्यातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी समित्या जाहीर …

Spread the love

पुणे : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी, राज्य सरकारने नवीन विद्यापीठ कायदा मागे घेतल्यानंतर आता राज्यातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरुंची निवड प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ या विद्यापीठांच्या कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या नियुक्त केल्या आहेत.


दरम्यान महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल करून राज्यपालांच्या अधिकारात कपात केल्यामुळे  राज्यातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया रखडली होती. मात्र राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून शासन नियुक्त सदस्यांची नावे सादर केली. तर काही दिवसांपूर्वी विद्यापीठ कायद्यातील बदलांचे विधेयक मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे  सरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा वाद निवळल्यानंतर आता राज्यपालांनी तीन समित्या नियुक्त केल्या आहेत. त्यामुळे आता कायद्यानुसार कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

अशा आहेत समित्या …

१. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये सदस्य आहेत.

२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी कर्नाटक उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये आयआयटी कानपूरचे संचालक डॉ अभय करंदीकर, शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर सदस्य आहेत.

३. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ प्रदीप कुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमध्ये गुजरातमधील वेरावळ येथील श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू गोपबंधू मिश्र, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी सदस्य असतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!