UttarPradeshCrimeUpdate : धक्कादायक : शिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्यांचा मृत्यू , शब्द नीट उच्चारता आला नाही….
लखनऊ : उत्तर प्रदेशातील औरैया येथून दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पीडित विद्यार्थ्याला एक शब्द नीट उच्चारता येत नसल्याने त्याच्या तथाकथित उच्चवर्णीय शिक्षकाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोमवारी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखित दोहरे या दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा शनिवारी रात्री राज्याच्या इटावा जिल्ह्यातील विशेष रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे की, शिक्षक अश्विनी सिंग यांनी ७ सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलावर लाथा , बुक्क्या , काठी आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. सामाजिक शास्त्राच्या परीक्षेदरम्यान एक शब्द चुकीचा उच्चारल्याने त्याला बेशुद्ध पडेपर्यंत त्याला मारहाण केली.
उपचारादरम्यान निखिलचा मृत्यू…
औरैयाच्या पोलिस अधीक्षक चारू निगम यांनी म्हटले आहे कि , अश्विनी सिंग या आरोपीविरुद्ध अचलदा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांनी ट्विटरवर पुढे म्हटले आहे कि , “आम्ही डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे पोस्टमार्टम करत आहोत. पोलिसांनी प्रथम माहिती अहवालात किंवा एफआयआरमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलमांचा समावेश केला आहे. आम्ही मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी आणि व्हिडिओ ग्राफ मिळविण्यासाठी इटावा सीएमओशी बोललो आहोत. पत्रव्यवहारही केला आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.
मुलाच्या कुटुंबाने शेअर केलेला व्हिडिओमध्ये सदर मुलगा स्ट्रेचरवर पडलेला असून त्याचे डोळे सुजलेले दिसतात. वडिलांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की शिक्षकाने मुलाच्या उपचारासाठी प्रथम १०,००० रुपये आणि नंतर ३०,००० रुपये दिले परंतु नंतर वडिलांचे फोन घेणे बंद केले. मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे की , जेव्हा त्याने शिक्षकाशी याबाबत विचारणा केली तेव्हा त्याला शिक्षकाने जातीवाचक शिवीगाळ केली. आम्ही त्याला अनेक रुग्णालयात नेले, पण त्याला वाचवता आले नाही.
उत्तर प्रदेश पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीच्या आधारे शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत.