Abhivyakti : Blog : प्रबोधनकार ठाकरे जयंती विशेष : पंडित नेहरू यांनाही माफी लागायला लावणारे प्रबोधनकार

केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे वडील तर महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आजोबा होते. प्रबोधनकार पत्रकार, समाजसुधारक, फर्डे वक्ते होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हिरीरीने सहभाग नोंदवला. सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. ध्येयासाठी कधीच कोणाशी किंवा कोणत्याही विचारांशी तडजोड केली नाही. बालविवाह, विधवांचे केशवपन, अभद्र रूढी, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही, अस्पृश्यतेचा प्रश्न, हुंडाप्रथेचा प्रश्न अशा सामाजिक प्रश्नांवरील सर्व आघाड्यांवर ते अखेरपर्यंत अगदी आवेशाने लढत राहिले.
प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. त्यांना ग्रंथांची खूप आवड होती. त्याबद्दलचा एक किस्सा – प्रबोधनकार एकदा ऋग्वेदाचा अभ्यास करत होते. त्यांना राजारामशास्त्री भागवत यांच्याकडून उडॉल्फ रॉथ या जर्मन अभ्यासकाने ऋग्वेदावरील लिहिलेल्या ग्रंथाविषयी माहिती मिळाली. तो इंग्रजी ग्रंथ त्यांना मुंबईत मिळाला; परंतु मूळ संस्कृत ग्रंथ खूप शोधूनही सापडेना. बडोद्याला हा ग्रंथ नक्की सापडेल म्हणून त्यांना समजले. त्याविषयी प्रबोधनकार आत्मचरित्रात म्हणतात, ‘उडॉल्फ रॉथ आणि कौटिल्य, यांच्या शोधासाठी बडोद्याची सफर करण्याचा बेत ठरला. तेथील राजेशाही ग्रंथालयात (सयाजीराव महाराजांनी स्थापन केलेले मध्यवर्ती ग्रंथालय) हमखास त्या प्रती निदान पाहायला तरी मिळतील, अशा उद्देशाने मी आणि सावलीसारखे अखंड माझ्या संगती असणारे स्नेही कै. शंकर सीताराम उर्फ बाबूराव बेंद्रे यांच्यासह बडोदा गाठला. तेथील मुख्य ग्रंथपाल कुडाळकर यांनी आमचे हार्दिक स्वागत केले आणि ते दोन्ही ग्रंथ आमच्यासमोर आणून ठेवले.
ग्रंथांची जपणूक …
रॉथच्या ग्रंथातून काही तपशील लिहून घेतला. बेंद्रे डिक्टेट करायचा मी शॉर्टहॅण्डमध्ये लिहून घ्यायचा. दोन दिवस काम चालले होते. कौटिलियम् अर्थशास्त्राची प्रत कसेही करून मिळवून द्या, अशी कुडाळकरांना विनंती करताच, त्यांनी ताडपत्री ग्रंथाचे वाचन – संशोधन करणाऱ्या मद्रासी शास्त्री मंडळींच्या टोळक्याच्या दालनात आम्हाला नेले. हे पाहा शास्त्री, हे आमचे मोठे अभ्यासू दोस्त आहेत. त्यांना शामाशास्त्र्यांचे कौटिलियम् अर्थशास्त्राची संस्कृत प्रत हवी आहे. काय करता बोला?” मुख्यशास्त्र्याने माझे नाव पत्ता लिहून घेतला. “कधी परत जाणार तुम्ही मुंबईला? चार दिवसांनी ना? ठीक आहे. तुम्ही दादरला जाताच त्या पुस्तकाची व्हीपी घेऊन पोस्टमन तुमच्या दाराशी आलाच समजा.” शास्त्रीबुवांचे आश्वासन घेऊन आम्ही चार दिवसांनी दादरला परतलो आणि घरात पाऊल ठेवताच सौभाग्यवतीने एक व्हीपी आल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी महिना दीड महिना सारखी पाठलाग करीत असलेली त्या ग्रंथाची प्रत एकदाची हाती आली.” सयाजीराव महाराजांनी संपूर्ण भारतातून जमवलेली ग्रंथसंपदा अशी अतिशय दुर्मिळ होती. त्यासाठी काम करणारे कुडाळकरांसारखे ग्रंथप्रेमी बडोद्यात असल्यानेच अशा ग्रंथाची जपणूक केली जात असे.
…आणि नेहरूंनी आपली चूक काबुल केली !!
पुढे जवाहरलाल नेहरूंनी शिवाजी महाराजांविषयी वाईट लिहिले याचा राग स्वाभिमानी प्रबोधनकरांना आला. त्याविषयी आत्मचरित्रात लिहितात, ‘नेहरूलिखित ‘ग्लिप्सेस ऑफ इण्डिया’ या इंग्रेजी ग्रंथात अफजुलखान प्रकरणी शिवाजीला खुनी ठरवून पंडित जवाहरलाल नेहरूंनी कुत्सित टीका केल्याचे प्रकरण उद्भवले. माझा स्वाभिमान आणि स्वदेशाभिमान खडबडून जागा झाला. ‘रायगडची गर्जना – गुर्रर्रर्र ढाँर्रक’ या मथळ्याचे एक छोटेखानी पुस्तक लिहून छापून घेतले. एक आणा किंमतीला सर्वत्र फैलावले. कै. दामोदर यंदे शेटजीने ते आपल्या एका मासिकात जशाचे तसे छापले. शिवाय मी इंग्रजीतूनही भारतीय अनेक भारदस्त साप्ताहिक दैनिकांतूनही लेख पाठविले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. नेहरूंनी जाहीर केले की, ‘मी तो ग्रंथ तुरुंगात असताना आणि जवळ विशेष कागदोपत्री पुरावा नसताना लिहिल्यामुळे, ही चूक माझ्या हातून घडलेली आहे.
संतप्त मराठ्यांनी मला क्षमा करावी. पुढल्या आवृत्तीत योग्य ती सुधारणा मी अगत्य करीन.’ ‘छान. एखाद्याने तुरुंगात ग्रंथ लिहावा, वाटेल त्या महाराष्ट्रेतिहासिक श्रेष्ठाची टिंगल करावी, हा धंदा छान! काहीही असो, या रायगडच्या गर्जनेने महाराष्ट्राला समजले का ठाकरे वाघ मेला नाही, जागताज्योत जिवंत आहे आणि महाराष्ट्राची कुचाळी करणारांच्या आंगावर तात्काळ झेप घालायला सिद्ध आहे.’ ज्या दामोदरशेटजींनी हे पुस्तक मासिकात छापले ते सयाजीराव महाराजांच्या निगराणीखाली तयार झालेले स्वाभिमानी साहित्यप्रेमी आणि वाङ्मयसेवक होते. त्यांनी बडोदा आणि मुंबईतून चारशेच्यावर ग्रंथ प्रकाशित केले होते तर सहा-सात वृत्तपत्रे चालवली होती. या दोन्ही प्रसंगी बडोद्यात तयार झालेल्या रत्नांनी प्रबोधनकरांना मदत केली.
प्रबोधनकारांना सयाजीराव महाराजांच्या सुधारणा खूप आवडत होत्या. जाती निर्मूलनाचा महाराजांचा सुधारणा विषयक कार्यक्रमाला त्यांचा पाठींबा होता. त्याविषयी एके ठिकाणी त्यांनी लिहिले, ‘श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी जन्मावरून जाती ठरविणा-या स्मृतिकारांच्या बेअक्कलपणाची फारच मार्मिक चिकित्सा केली आहे.’
डॉ. राजेंद्र मगर
(सोलापूर)