Blog । स्मरण । अभिव्यक्ती : बाबासाहेबांसारख्या युगप्रवर्तकाला घडवणारी युगनिर्माती माता रमाई….

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्नीप्रति कृतज्ञता म्हणून १९४० साली प्रकाशित केलेला ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा वैचारिक ग्रंथ रमाईला अर्पित केला. अर्पण पत्रिकेत बाबासाहेब म्हणतात, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी, अशा दिवसांत तिने मला दाखविली-जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रहीन काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूप्रति कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आठवणींचे हे प्रतीक.” आपल्या पत्नीबद्दलच्या प्रेमभावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त होतात.
रमाईने व्यक्त केलेली बाबासाहेबाप्रतीची कृतज्ञता तर अधिक हृदयस्पर्शी आहे. रमाई म्हणते, “तुम्ही माझे पती आहात या एका सुखापुढे माझी हजार दुखं पार मरून गेली आहेत. कोणीच कोणाला देऊ शकणार नाही एवढे तुम्ही मला दिलेत. तुमच्यासाठी मी काही छोटी दुखं भोगली, पण आता त्यांचा हि केवढा गौरव वाटतो. अशा दुःखाचे अलंकार युगायुगातून एखाद्याच स्त्रीच्या वाट्याला येतात साहेब.” रमाई हे कारुण्य व सहनशीलता याचे अजोड शिल्प होती, मूकनायकाची ऊर्जा होती. डॉ.आंबेडकरांच्या सुखदुःखात सहभागी होणारी, त्यांचे जीवन घडवणारी, त्यांना सदोदित प्रोत्साहित करणारी होती. म्हणून बाबासाहेबांसारख्या एका महान क्रांतियोद्धा व युगप्रवर्तकाला घडवणाऱ्या माता रमाईला एक युगनिर्मातीच म्हटलं पाहिजे!
रमाईचे माहेर …
रमाईचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना तीन बहिणी व शंकर हा एक भाऊ होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात हमालीचे काम करत असत. रमा लहान असतानाच त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले. सुभेदार रामजी आंबेडकरांना रमा पसंत पडली. रमाई व बाबासाहेबांचा विवाह भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ मध्ये झाला. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १५ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला.
पत्रातील बाबासाहेब आणि रमाई …
इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. जिद्दीने दुःखांशी, अडचणींशी, गरिबीशी सामोरे जात होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान या साऱ्यांचं अलौकिक रसायन म्हणजेच रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी खचत होती परंतु धीर सोडत नव्हती. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व इ.स. १९२६ मध्ये राजरत्नचा मृत्यू पाहिला.
बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. बाबासाहेब अमेरिकेला गेले तेव्हा ते रमाईला पत्र लिहून धीर देण्याचा प्रयत्न करतात. ते लिहितात, “रामू, अशा दुःखानी दुःखी व्हायचे नसते. मी वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभे करीन. तिथल्या गुलामीची कंबर बांधीन. या लढाईत मी हरणार नाही. यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राह्यला हवी. रमा दुःखातूनच वाट काढायची आहे.” अशा पत्राने रमाईला बाबासाहेबांचा अभिमान वाटत असे आणि जगण्यासाठीचे बळ मिळत असे. बाबासाहेबांना पत्र लिहून रमाई सुद्धा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे अभिवचन देऊन बाबासाहेबांचा उत्साह वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असे!
स्वतःचे दागिने गहाण ठेवून विद्यार्थ्यांची भूक भागवणारी रमाई
धारवाडला बाबासाहेबांचे सहकारी बळवंतराव हनुमंतराव वराळे व त्यांच्या पत्नी राधाबाई हे कुटुंब राहत होते. त्यांच्याकडे बाबासाहेबांचे जाणे येणे होत असे. बाबासाहेबांना तेथील थंड व कोरडे हवामान आरोग्यास उपायकारक वाटत असे. एकदा बाबासाहेबांना परदेशी काही कामानिमित्त जायचे होते. वराळे कुटुंबियांच्या आग्रहाखातर धारवाडला हवापालट होण्यासाठीरमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.
बळवंतराव वराळे धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. एकदा वराळे लोकल बोर्डाच्या निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असल्यामुळे मुलांचे राशन संपल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. अचानक धान्य संपल्यामुळे व जवळ पैसे नसल्यामुळे ते अस्वस्थ झाले हि अस्वस्थता आपली पत्नी राधाबाई जवळ बोलत असताना रमाईने ते ऐकले व ताबडतोब जवळ असलेले काही पैसे व एक दागिना वराळेंकडे सुपूर्द केला व मुलांच्या जेवणाची सोय ताबडतोब करा असे सांगितले. रमाईचे बोर्डिंगच्या गरीब मुलांसाठीचे हे औदार्य पाहून वराळे कुटुंबीय भावुक झाले. वराळे यांनी ते दागिने घेतले नाही परंतु मुलांच्या जेवणाची त्यांनी कशीबशी सोय केली. त्या मुलांना आनंदाने खेळताना बागडताना पाहून रमाई खूप आनंदी होत असत.(संदर्भ:मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या सहवासात, राधाबाई बळवंतराव वराळे यांचे आत्मचरित्र)
बाबासाहेबांचे रमाईप्रती काढलेले गौरवोद्गार
डॉ.बाबासाहेब रमाईस प्रेमाने ‘रामू’ म्हणत असत तर रमाईंनी जन्मभर बाबासाहेबांना आदराने, सन्मानाने ‘साहेब’ म्हणून संबोधले. बाबासाहेबांचा विवाह जरी रमाई सोबत झाला असला तरी त्यांचा विवाह विद्येशीच झाला आहे कि काय असे वाटत होते. आजन्म विध्यार्थी असल्यासारखे कायम ग्रंथांच्या सान्निध्यात आकंठ डुंबलेले असत तरी रमाई कसलाही त्रागा करून न घेता बाबासाहेबांची सदैव सेवा करीत असे. कर्तव्यदक्ष रमाई अनेकदा त्यांना जेवणासाठी विनंती करत, आग्रह करीत परंतु तरीही बाबासाहेबांना जेवणाचे भान राहत नसे, पतीने जेवण केले नाही म्हणून ही सहचारिणी देखील उपाशी राहत असे.
रमाई विषयी बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत भारत’ मध्ये म्हटले आहे, “मी विदेशात असताना तिने रात्रंदिन आपल्या प्रपंचाची काळजी वाहिली व वाहत आहे. अशा रामूने मी विदेशातून परत आल्यावरही विपन्नावस्थेत शेण स्वतःच्या डोक्यावर वाहून नेण्यास जिने मागेपुढे पाहिले नाही अशा अत्यंत ममताळू, सुशील, पूज्य स्त्रीच्या सहवासात मला जास्त वेळ घालवता येत नाही, याचे मला दुःख होते.”
रमाईचे आपत्यप्रेम
स्वभावाने शांत असलेल्या, बोलण्यात विनयशील, गंभीरवृत्तीच्या, प्रकृतीने जेमतेम पण संसारात व्यवहारदक्ष असलेल्या रमाईच्या मनात पतीविषयी अपार श्रद्धा, प्रेम, काळजी होती. जीवनातील कडु-गोड अनुभव घेत रमाई बाबासाहेबांसोबत सांसारिक आयुष्य जगत होत्या. १९२४ पर्यंत त्यांच्या संसाराच्या वेलीवर एकूण पाच अपत्ये फुलली होती. त्यापैकी यशवंत सोडून बाकी सर्व दोन-अडीच वर्षाचे अल्पायुषीच ठरले होते. तीन मुले आणि एक मुलगी काळाने हिरावून नेली. सगळी मुले प्रकृतीने नाजूक होती. मुलगी देखणी होती परंतु अशक्त होती. रमाई मुलीच्या आठवणीने व्याकुळ होत असत इंदू हे नाव मोठ्या हौसेने ठेवलेले होते. छोटा ‘ राजरत्न’ या दाम्पत्यास अत्यंत प्रिय होता परंतु १९ जुलै १९२६ ला न्युमोनिया होऊन त्याचा मृत्यू झाला. तशातच तिच्या आजारपणात आणखी भर पडत होती. तरी ती आजारपणातही स्वतःच्या तब्येतीपेक्षा आपल्या पतीची जास्त काळजी घेत होती. रमाई पतीच्या सुरक्षिततेसाठी उपवास करायची.
पंढरपूर दर्शनाची इच्छा आणि बाबासाहेबांचे उत्तर
रमाईने पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन घेण्याची इच्छा एकदा बाबासाहेबांसमोर व्यक्त केली.परंतु बाबासाहेबांना माहिती होते की, स्पृश्यांच्या त्या मंदिरात या अस्पृश्य स्त्रीस बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. या संभाव्य अपमानाची कल्पना देऊन रमाईला पंढरपूरला नेण्यास नकार दिला व म्हणाले, “जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर लोटते, त्या पंढरपूरची कथा ती काय? आपल्या उभयतांच्या पुण्याईने स्वार्थ त्यागाने, सेवेने दलितांसाठी आपण दुसरी पंढरी निर्माण करू!’ आणि डॉ. आंबेडकरांनी आपल्या अर्धांगिनीच्या अमुल्य सहकार्यने करोडो दलितांच्या जीवनात क्रांती आणली, नागपूरची दीक्षाभूमी ही पंढरपूरपेक्षाही महान क्रांतीभूमी ठरवली!
बाबासाहेब वेरुळची सहल आटोपून मुंबईला परत आले तेव्हा रमाबाईंनी अंथरूण धरले होते त्यांचा आजार १६.१.१९३५ ला बराच वाढला होता. रमाबाईना अनेक डॉक्टरांचे औषधोपचार चालू होते. सतत चार महिने त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होता. मे महिन्याच्या २२ तारखेस प्रकृती चिंताजनक असल्याचे जाणवू लागले. त्यावेळी बाबासाहेब पनवेलला मुलांचे वस्तीगृह स्थापन करण्याच्या कामासाठी तेथे जाऊन राहिले होते. बाबासाहेब २४ तारखेस मुंबईस आले. आल्यापासून ते रमाईंच्या जवळ बसून होते. रमाई साहेबांकडे टक लावून बघत, त्यांना बोलण्याचे त्राण नव्हते. स्वतः बाबासाहेब रमाईंना औषध देत होते, बशीत कॉफी ओतून त्यांना ती पिण्याचा आग्रह करीत होते. मोसंबीचा रस साहेब स्वतःच्या हाताने आग्रहाने पाजीत होते. रमाई साहेबांच्या आग्रहाखातर थोडेसे घेत मात्र रविवारी तारीख २६ मे,१९३५ ला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रमाईंनी डोळे मिटले. त्यांचा श्वास जड होऊन मंदावला. घरातील लोकांनी हंबरडा फोडला. “तू मला सोडून गेलीस तुला मी काही सुख दिले नाही तू माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्यास त्याग केलास” असे म्हणून साहेब ओकसाबोकसी रडू लागले. त्यांच्या शोकाकुल टाहोने राजगृह व आसपासचे वातावरण शोकसागरात बुडून गेले. ( संदर्भ: डॉ भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७, लेखक चां. भ. खैरमोडे )
आणि बाबासाहेब जेंव्हा ढसाढसा रडले….
स्मशानात अग्निसंस्कार झाल्यानंतर पुन्हा साहेबांनी टाहो फोडला. लोकांनी त्यांची समजूत घातली सर्व मंडळी राजगृहात परत आली. तो सर्व दिवस व २६ मेची रात्र साहेबांना पत्नीच्या अनेक आठवणी येऊन दुःखाचे उमाळे येत होते. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. आप्तेष्टांनी ही त्यांना मनसोक्त रडू दिले कारण यापुढे साहेब आपले हे दुःख कधीच असे प्रकट करू शकले नसते! पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाई मध्येच अचानक सोबत सोडून कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी पडले.
बाबासाहेब १९२३ ते १९२९ काळातील आठवणी काढून गहिवरून म्हणत, “तिने माझ्यासाठी अपार कष्ट सहन केले, उपास केले, एका वस्त्रांनिशी घरात राहिली. मला आमच्या मुलांना वाचवण्यासाठी काही करता आले नाही. मी यापुढे यशवंत, आमच्या एकूलत्या एक मुलासाठी जेवढे करता येईल तेवढे करीन, याला औषधोपचारासाठी लंडनला घेऊन जाईन. १९१३ ते १९२३ या काळात मी माझी बौद्धिक व मानसिक शक्ती वाढविण्यासाठी एखाद्या योग्याच्या निष्ठेने समाजाच्या उन्नतीला आवश्यक असणाऱ्या सर्वांगीन अभ्यासाची समाधी लावली.
दररोज वीस-बावीस तास अभ्यास केला, पदव्या मिळविल्या. मी प्रकांड पंडित झालो पण कुटुंबासाठी मी काहीच करू शकलो नाही. अशा प्रकारच्या आठवणींनी बाबासाहेब अक्षरशः घायाळ होत होते. रमाईच्या मृत्यूने त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती! म्हणून डॉ यशवंत मनोहर आपल्या रमाई कादंबरीत म्हणतात, “रमाई हि केवळ एक व्यक्ती नव्हती. एखादं पात्र नव्हतं. ती केवळ एक स्त्री नव्हती. ते होते मातृत्वाचे महाकाव्य. ती मातृत्वाची मातृमनाची काळजीकथा होती. जीवनाचा तो एक संपूर्ण दुःखाशय होता. रमाई मातृत्वाचं आसवानी बोलणारं मिथ होती.” अशा या मातृत्वाच्या महाकाव्याला व अखंड ऊर्जा वाहिनीला कोटी कोटी वंदन!
भीमराव सरवदे
औरंगाबाद, मो ९४०५४६६४४१
(लेखक सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी असून आंबेडकरी व पेरियार चळवळीचे अभ्यासक आहेत.)