Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : अखेर औरंगाबादेतील बहुचर्चित लेबर कॉलनीवर चालवला जात आहे बुलडोझर ….

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद्करांसाठी कायम चर्चेचा विषय बनून राहिलेली लेबर कॉलनी जमीनदोस्त व्हायला अखेर आज भल्या पहाटे प्रारंभ झाला आणि या अध्यायाची समाप्ती झाली. आज होणार, उद्या होणार असे म्हणत चघळत राहिलेल्या लेबर कॉलनीच्या पाडापाडीच्या विषयाचा अखेर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत ‘दी एंड’ सुरु झाला .

आज पहाटे सहा वाजताच लेबर कॉलनी, विश्वास नगर येथील घरांच्या पाडापाडीला सुरुवात झाली. शासनाच्या विविध विभागातील सुमारे शंभरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली कारवाई सुरु झाली. यावेळी इमारतींवर बुलडोझर चालवला जात असताना पत्त्यासारख्या त्या इमारती कोसळत होत्या. हे पाहून तेथे सुमारे चार दशके तेथे राहिलेल्या लोकांना अश्रू अनावर झाले होते.

लेबर कॉलनीतील रहिवाशांनी स्वतःहून घरांचा ताबा शासनाला द्यावा, असे न्यायालयाचे आदेश आहेत. तसे न झाल्यास ही घरे पोलिस बळाचा वापर करून पाडावी लागतील. ११ मे रोजी सकाळी ६ वाजता ही कारवाई सुरु होईल, असे दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते. त्यानुसार लेबर कॉलनी, विश्वासनगर या भागात रात्रीपासूनच तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

ठरल्याप्रमाणे सकाळी सहाच्या ठोक्याला पडपडीची कारवाई सुरु करण्यात आली. अण्णा भाऊ साठे चौकातून शहागंजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरला असलेल्या घरांवर सर्वात आधी बुलडोझर चालवून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर हळूहळू पुढे जात कारवाई करण्यात आली. ऊन वाढण्याच्या आत बरेचसे पाडकाम करावयाचे असल्याने क्षणभराची विश्रांती न घेता आधी घरांवर बुलडोझर चालवून नंतर ढिगारे हटविण्याचे काम मजूर करीत आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी कारवाईच्या ठिकाणी उपस्थित आहेत. पाडापाडी मोहिमेत ३२ विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकंदरीत ९५ अधिकारी, ४०० कर्मचारी, मजूर, १५ जेसीबी, ५ पोकलेन, २०० पोलिस, ८ रुग्णवाहिका, ४ डॉक्टर, १० वैद्यकीय कर्मचारी आदींचा या मोहिमेत सहभाग आहे

परिसरात नो एन्ट्री

लेबर कॉलनी आणि कलेक्टर ऑफिस यांच्या मध्ये साठे चौक आहे. याठिकाणी जळगावकडून येणारा रस्ता आणि टीव्ही सेंटरकडून गणेश कॉलनीमार्गे येणारा रस्ता या दोन मार्गांवरून शहरात येण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी असते. लेबर कॉलनीवरील कारवाईच्या वेळी या रस्त्यांवरून वाहतूक सुरु राहिल्यास कारवाईत अडथळा निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन काल सायंकाळपासूनच या दोन्ही मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. शिवाय लेबर कॉलनीकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेटिंग करून बंद केले गेले आहेत. कारवाईच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण व आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच घरे पडताना कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून बुधवारपासून जमावबंदी आदेशही लागू करण्यात आला होता.

बहुतांश घरे रिकामी; रहिवाशांना अश्रू अनावर

९५३ साली २० एकर भूखंडावर प्रशाकीय अधिकाऱ्यांसाठी ३३८ घरे बांधून लेबर कॉलनी वसविण्यात आली होती. मात्र, सेवानिवृत्तीनंतर तेथे राहणाऱ्या बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही घरे रिकामी केली नव्हती. पुढे हा विषय रेंगाळत राहिला. तेथील रहिवाशांच्या दोन पिढ्या तेथे जगल्या. नंतर घरे रिकामी न करता लेबर कॉलनीतील अनेकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वच ठिकाणी त्यांच्या पदरी निराशा आली. अखेर न्यायालयाने लेबर कॉलनी, विश्वास नगरवासियांना १० मे ही घरे रिकामी करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. आता काहीच होणार नाही याची कल्पना आल्याने अनेक रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास सुरुवात केली होती. दोन दिवसांपूर्वीपर्यंतच ८० टक्के घरे रिकामी करण्यात आली होती. त्यानंतर काल दिवसभरात उर्वरित लोकांनीही घरे रिकामी करून शासनाच्या हवाली केली. त्यामुळे प्रशासनाला ही घरे पाडण्यात विरोधाला सामोरे जावे लागले नाही. मात्र, पाडापाडी सुरु सल्यानंतर येथे दोन पिढ्यांपासून वास्तव्य असणाऱ्या लोकांना नजरेसमोर घरे पडली जात असल्याचे पाहून अश्रू अनावर झाल्याचे दृश्य दिसून आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!