Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर , सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला , हृदयविकाराचा धक्का नसल्याचा खुलासा …

Spread the love

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आता मुंडे यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर  ब्रिच कँडीमधील तज्ञ डॉक्टर उपचार केले जात आहेत. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे असून सततचा प्रवास आणि दगदगीतून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली आणि त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले.  डॉक्टरांनी त्यांना आणखी काही चाचण्या सांगितल्या असून सक्तीच्या विश्रांतीचा  सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली.  येत्या तीन – चार दिवसात त्यांना आराम मिळेल, असेही अजित पवार म्हणाले. रुग्णालयाच्या वतीने डॉ. प्रतीत समदानी यांनी अधिक माहिती दिली. काल धनंजय मुंडे जनता दरबारास उपस्थित होते, त्यानंतर ते शरद पवार यांना भेटले, या दरम्यान प्रकृती अस्थिर होऊन त्यांना भोवळ आल्याने शुद्ध हरपली होती, अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांना दिली. दरम्यान काल सायंकाळी धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही विचारपूस करत माध्यमांना मुंडेंच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. काळजी करण्यासारखे काही नाही, असे राजेश टोपे म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांकडूनही चौकशी

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे, युवक नेते पार्थ पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चौकशी केली तसेच बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

धनंजय तू आराम कर – अजित पवार

रुग्णालयातील चर्चे दरम्यान उद्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने केली आहे. याबद्दल चर्चा करताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘धनंजय तू आधी बरा हो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आम्ही सगळे मिळून यशस्वी करू;’ असा स्नेहाचा सल्लाही धनंजय मुंडे यांना दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!