Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkrainWar : रशियाने युक्रेनमधील खेरसन शहर ताब्यात घेतल्याचा दावा, कीव आणि खार्किवमध्ये मोठे नुकसान

Spread the love

कीव :  युक्रेन आणि रशियामधील युद्ध तीव्र होत आहे. युद्धाच्या सातव्या दिवशी रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांना लक्ष्य केले. राजधानी कीव आणि खार्किवमध्ये रशियाच्या हल्ल्यात मोठा विध्वंस झाल्याची चर्चा आहे. रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेने जात असून युक्रेनचे सैन्य त्यांच्याशी लढत आहे. रशियन सैन्याने युक्रेनमधील खेरसन ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी ही माहिती दिली आणि सांगितले की, “सशस्त्र दलांच्या रशियन तुकड्यांनी खेरसनवर संपूर्ण ताबा मिळवला आहे.” रशियन सैन्य युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त करण्यात गुंतले आहे. आज रशियन लष्कराने खार्किव मिलिटरी अकादमीलाही लक्ष्य केले असून त्यावर रॉकेट डागले आहेत. रिपोर्टनुसार, रशियन सैन्याने अनेक निवासी भागांवरही हल्ले केले आहेत. युद्धभूमीवर आतापर्यंत 498 सैनिक मारले गेले असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.


दरम्यान  युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारत सरकारकडून  पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाक रिपब्लिकमध्ये हे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या देशांना युक्रेनची सीमा आहे. विशेष म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक दिवसांपासून युद्ध सुरू असून हे युद्ध संपवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चाही झाली होती, जी पूर्णपणे अपयशी ठरली होती. यानंतर रशिया आणखी आक्रमक झाला आहे. रशिया युक्रेनच्या अनेक शहरांवर वेगाने हल्ले करत आहे.

200 भारतीय युक्रेनमधून रोमानियामार्गे परतले

रोमानियाहून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे पहिले विमान C17 ग्लोबमास्टर हिंडन एअरबेसवर पोहोचले. या विमानात 200 लोक आहेत.  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली आणि पूर्व युक्रेनमधील खार्किव शहरातील परिस्थितीबद्दल चर्चा केली, जिथे एक हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला, विशेषत: खार्किवमध्ये, जिथे मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनी युद्धग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत चर्चा केली. आतापर्यंत 17,000 भारतीयांनी युक्रेन सोडल्याचे सरकारने म्हटले आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत 3,352 भारतीय भारतात परतले आहेत. पुढील 24 तासांत 15 उड्डाणे नियोजित आहेत, त्यापैकी काही मार्गावर आहेत.

युक्रेनला मदतीचा हात, दोन्हीही देशांना महागाईची झळ

दरम्यान, या युद्धात युक्रेनची ताकद कमी पडताना दिसत असून  युक्रेनच्या मदतीला अद्यापतरी कोणताही देश थेटपणे आलेला नाही. पण, अमेरिकेसह युरोपियन युनियनमधील देशांनी युक्रेनला अप्रत्यक्ष मदत देणे सुरू केलं आहे. याचाच भाग म्हणून रशियासोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) युक्रेनला (Ukraine) आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. चीनच्या संवाद समिती शिन्हुआच्या अहवालानुसार, दोन्ही आंतरराष्ट्रीय संस्था युक्रेनला आर्थिक आणि धोरणात्मक आघाडीवर मदत करणार आहेत.

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा आणि जागतिक बँकेचे समूह अध्यक्ष डेव्हिड मालपस यांनी संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की, युद्धामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या असून महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक त्रास गरिबांना होणार आहे. दरम्यान रशिया-युक्रेनमधील परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास आर्थिक बाजारपेठेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांत जाहीर झालेल्या निर्बंधांचाही आर्थिक परिस्थितीवर परिणाम होणार आहे. दोन्ही संस्था सध्या परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत सद्य परिस्थितीला सामोरे जाण्याच्या धोरणात्मक पैलूवर चर्चा करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!