Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkraineWarUpdate : धक्कादायक : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाना टिपण्यासाठी आलेल्या ‘स्पेशल फोर्स’ चाच बहादूर सैनिकांनी केला खातमा …

Spread the love

कीव : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना टिपण्यासाठी आलेल्या रशियन चेचन स्पेशल फोर्सचे मनसुबे धुळीला मिळवून युक्रेनच्या सैन्याने या स्पेशल तुकडीचा धुव्वा उडवण्यात यश मिळवले असल्याचे वृत्त आहे.  या संबंधीच्या वृत्तानुसार युक्रेनच्या सैन्याने कीव शहराच्या ईशान्येकडील होस्टोमेल या शहराजवळ  मिसाइल डागले असून त्यात रशियाच्या ५६ टँक नष्ट  करून या  तुकडीतील मोठ्या प्रमाणात सैनिकांना ठार मारल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे.


दरम्यान युक्रेनच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात ‘चेचन स्पेशल फोर्स’चे नेमके किती सैनिक मारले गेले याचा आकडा अद्याप समोर आला नसला तरी यामध्ये शेकडो सैनिक ठार झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडूनही या माहितीला दुजोरा दिला गेला आहे. शनिवारी चेचन स्पेशल फोर्सवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. त्यात एक तुकडी नष्ट करण्यात आली, असे नमूद करण्यात आले आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार’चेचन स्पेशल फोर्स’चा जनरल मॅगोमेद तुशेव हा या तुकडीचे नेतृत्व करत होता या हल्ल्यात त्याचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष  म्हणजे चेचन्या राज्याचे प्रमुख रमझान कादिरोव्ह हा  या स्पेशल फोर्सचा प्रमुख असून त्याच्या नेतृत्वाखाली  अनेक धाडसी मोहिमा या फोर्सने फत्ते केलेल्या आहेत. अशावेळी युक्रेनने मात्र या फोर्सला तगडा झटका दिला आहे. त्यातही तुशेव हा कादिरोव्ह यांच्या अगदी खास मर्जीतील असल्याने त्याच्या मृत्यूने स्थिती आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या टार्गेटवर आहेत. याशिवाय अन्य काही नेते आणि वरिष्ठ अधिकारी रशियाच्या निशाण्यावर आहेत. या सर्वांची हत्या करण्याच्या इराद्यानेच पुतीन यांनी चेचन स्पेशल फोर्स धाडले होते. यामागे पुतीन यांची अनेक गणिते होती. मात्र, शिकारी (हंटर्स) अशी ओळख असलेल्या चेचन स्पेशल फोर्सचीच युक्रेनी सैन्याने शिकार केल्याने हा रशियासाठी आणि पुतीन यांच्यासाठी सर्वात मोठा हादरा ठरला आहे.

रशियाविरुद्ध युक्रेन आंतरराष्ट्रीय न्यायालयात

“युक्रेनने रशियाच्या विरोधात आपला अर्ज आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सादर केला आहे. आक्रमकतेने युक्रेनमध्ये नरसंहार केल्याबद्दल रशियाला जबाबदार धरले पाहिजे. तसेच आम्ही रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचा आदेश देण्याची विनंती करतो आणि पुढील आठवड्यात याप्रकरणी सुणावणी सुरू होण्याची अपेक्षा करतो,” असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे.

दरम्यान रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाली आहे. याबाबत पीडित विद्यार्थ्यांना आलेल्या ह्रदयद्रावक अनुभव माध्यमांना सांगितले आहेत. युक्रेन-पोलंड सीमेवर युक्रेनच्या सुरक्षा रक्षकांनी केवळ युक्रेनच्या नागरिकांना प्रवेश दिला आणि भारतीयांना बाजूला काढून मुले  आणि मुली न पाहता लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या तक्रारी भारतीय विद्यार्थ्यांनी केल्यामुळे त्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक अडचणींचा सामना करून  पोलंडमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी  ४ रांगा गेल्या परंतु नंतर त्यांना ३ रांगा करण्यास सांगून  त्यांनी पुन्हा बंदुका घेऊन मारहाण केली.

सर्व भारतीयांना सरकारी खर्चाने परत आणणार : राजनाथ सिंह

देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील नागरिकांना मायदेशी पार्ट आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागण्या केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी “युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सरकारी खर्चाने देशात परत आणले जाईल. यासाठी आम्ही युक्रेनच्या शेजारील देशांच्या परवानगीने विमानांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती दिली असली तरी एकूणच युद्धाच्या छायेतील युक्रेनमधून अनेक लोक शेजारी देशांचा आसरा घेत सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत आहेत. मात्र, युक्रेनमधून शेजारी देशांमध्ये जाताना भारतीयांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. आधी युक्रेनच्या नागरिकांना प्राधान्य दिले  जात आहे. भारतीयांना प्रवेश दिला जात नाही, अशी तक्रार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेन सीमेवर नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!