ParbhaniNewsUpdate : मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना अज्ञात वाहनाने चिरडले , दोन ठार दोन जखमी

परभणी : परभणी जिल्ह्यातील केकरजवळा येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळावर पोहचले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
परभणीच्या मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे रविवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना चिरडले . यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौघांना चिरडून वाहन चालक फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.मृतांमध्ये केकरजवळा गावच्या पोलीस पाटलांचाही समावेश आहे. पोलीस पाटील उत्तम लाडाने, आत्मराम लाडाने यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर नंदकिशोर लाडाने, राधेश्याम लाडाने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.