AurangabadNewsUpdate : पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला चांगली वागणूक द्यावी : डॉ. निखिल गुप्ता

औरंगाबाद : पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगली वागणूक द्यावी. ठाण्यात जाऊन आल्याचे त्यांना समाधान वाटले पाहिजे, असे पोलीस ठाण्याचे वातावरण असावे अशा शब्दात शहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पोलिसांना आवाहन केले. औरंगाबाद पोलीस आयुक्तलयाचा दर्जा वाढवून डॉ. गुप्ता यांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती मिळाल्यानंतरत्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.
पोलीस आयुक्तालयाच्या विकासाबद्दल ते म्हणाले कि , अपर पोलीस महासंचालकपदाचा दर्जा कायम राखण्यासाठी शहरात आणखी चार नवीन पोलीस ठाणी वाढण्याची गरज आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालयांतर्गत शेंद्रा एमआयडीसी आणि रांजणगाव या दोन नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करणे, तसेच अधीक्षक कार्यालयांतर्गत कार्यरत चिकलठाणा पोलीस ठाण्याचा आयुक्तालयात समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी गृहमंत्री, पालकमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे पाठपुरावा करणार आहे.
पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, शासनाच्या निर्णयानुसार येथील पोलीस आयुक्तांचे पद हे अपर पोलीस महासंचालक दर्जाचे करण्यात आले आहे. पुढील काळात या पदाचा दर्जा कायम राहण्यासाठी शहरात चार नवीन पोलीस ठाणी वाढण्याची गरज आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पोलीस आयुक्तालयाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. त्यानुसार करमाड पोलीस ठाण्याचे विभाजन करून शेंद्रा एमआयडीसी हे नवीन पोलीस ठाणे निर्माण करावे. चिकलठाणा पोलीस ठाण्याचा समावेशही आयुक्तालयाच्या हद्दीत करावा. वाळूज पोलीस ठाणे आणि ग्रामीणमधील बिडकीन पोलीस ठाण्याचे विभाजन करून रांजणगाव हे नवीन पोलीस ठाणे स्थापन करावे, असा हा प्रस्ताव आहे.
या प्रस्तावानुसार ग्रामीणमधील पोलीस ठाण्यांचा शहरात समावेश करताना ठाण्यातील नियुक्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदासह करावा. जेणेकरून नवीन मनुष्यबळ भरण्याचा ताण शासनावर पडणार नाही. हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी गृहमंत्री, पालकमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान शहरात सध्या दोन परिमंडळे कार्यरत आहेत. शहराचा वाढता विस्तार, विविध औद्योगिक वसाहती आणि गुन्ह्यांचे प्रमाण या बाबी लक्षात घेऊन येथे तीन परिमंडळे असावीत. एखाद्या घटनेनंतर पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन बारकावे हेरून तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करू शकतात. याशिवाय आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेकरिता एक आणि वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्त गरजेचे आहेत, असेही निखिल गुप्ता यांनी सांगितले.