Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्र्यांकडून श्री विठ्ठल-रखुमाईची विधिवत पूजा , पंतप्रधान मोदींनीही दिल्या शुभेच्छा

Spread the love

पंढरपूर :  महाराष्ट्राचे  अराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक नतमस्तक झाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या गाभाऱ्यात शासकीय महापूजा पार पडली. करोनाच्या पार्श्वभूमीवर  शासनाने या वर्षीही पायी वारीला परवानगी नाकारली होती; मात्र प्रतिनिधीक स्वरूपात मानाच्या दहा दिंड्यांना परवानगी देण्यात आली होती. पुष्पांनी सजलेल्या शिवशाही बसेसमधून संतांच्या पालख्या भूवैकुंठी दाखल झाल्या होत्या.


कोरोनामुळे लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा आषाढी एकादशीचा सोहळा करोनाच्या संकटामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षीही  मोजक्या उपस्थितीत पार पडला. करोनामुळे विविध नियम बंधनांमध्येच मागील वर्षीप्रमाणे यंदाही पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते मोजक्या लोकांच्या हजेरीत विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली.

वारकऱ्यांच्यावतीने कोलते दाम्पत्याला पूजेचा मान

यंदा मुख्यमंत्र्यांसोबत कोलते दांपत्याने विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. केशव शिवदास कोलते (७१) व इंदूबाई केशव कोलते (६६) (रा. संत तुकाराम मठ, वर्धा) यांना यंदाच्या महापूजेचा मान मिळाला. केशव कोलते हे गेल्या वीस वर्षांपासून एकटेच पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात २४ तास वीणा वाजवून सेवा करीत आहे. त्यांच्या पत्नी इंदूबाई व मुलगा ओमप्रकाश कोलते हे वर्ध्यातील घरी राहतात. त्यांना दोन मुली आहेत. ते वीस वर्षांपासून माऊलींच्या सेवेत आहेत. पंढरपूर देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहणीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, प्रकाश जवंजाळ, कार्यकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी मानाचा वारकरी म्हणून त्यांची निवड केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईहून ८ तसंच प्रवास करून स्वतः गाडी चालवत वाहनाने  आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त पंढरपुरात दाखल झाले.  पंढरपुरात आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विश्रांती न घेता शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा

दरम्यान महाराष्ट्रातील हा मोठा उत्सव लक्षात घेता आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करून आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे कि , “आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करुया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!