Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MonsonNewsUpdate : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस

Spread the love

औरंगाबाद :  पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार गेल्या २४  तासात मराठवाड्यातील परभणी , नांदेड , बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात  काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असल्याचे वृत्त आहे.  यापैकी परभणी,नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून बीड,लातूर,औरंगाबादमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाआहे. ज्यामुळे अनेक पिकांना मात्र जीवदान मिळाले असले तरी नांदेड आणि परभणी शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था मात्र  वाईट झाली आहे.


परभणी जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणचे रस्ते अजूनही बंद झाले आहेत.काल रात्री पाथरी-परभणी राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या किन्होळा पाटीवरील लिंबोटी पुल कालच्या पावसात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे रस्त्यांच्या दोन्हीही बाजूनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असुन ज्यांना पाथरी, उमरी मार्ग माहिती आहे ते वाहन चालक या पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत.प्रशासनाकडून हा रस्ता सुरळीत करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे .

ओढ्याच्या पुरात आईसह मुलगा गेला वाहून

हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात ओढ्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने एका महिलेसह त्यांचा मुलगा वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली असून पती आणि चालक या घटनेत बचावले आहेत. रात्रभर शोधकार्य सुरू होते मात्र आई आणि मुलगा दोघांचेही मृतदेह मात्र अद्याप सापडले नाहीत. औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके पोटा येथील रामदास शेळके,वर्षा योगेश पडोळ,योगेश पडोळ व मुलगा श्रेयश पडोळ हे चार जण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी असोला मार्गे औरंगाबादला निघाले होते.यावेळी चालक योगेशला ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही. त्यांनी गाडी काढण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी गेली नाही आणि इथेच योगेश पडोळ,वर्षा पडोळ,श्रेयश पडोळ हा सात वर्षाचा मुलगा तिघे उतरले पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे तिघेही पाण्यात वाहून गेले.  रामदास शेळके,चालक योगेश यांना बाहेर काढण्यात यश आले.

दरम्यान,तहसीलदार कृष्णा कानगुले,सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा शोध घेत आहेत रात्री उशीरापर्यंत हे शोधकार्य सुरूच होते सकाळी पुन्हा हे शोधकार्य सुरू करण्यात आले मात्र अद्याप आई आणि मुलगा यांचा मृतदेह मात्र सापडला नाही.

नांदेड , बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस

गेल्या महिनाभर दडी मारलेल्या पावसाने कालपासून नांदेड शहरासह जिल्हाभरात दमदार हजेरी लावली आहे. काल दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड शहर मात्र जलमय झाले. मागच्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काल दुपारपासून बीड जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केली आहे. बीड शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा तर अंबाजोगाई तालुक्यात परळी आणि माजलगाव परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

परभणी शहर आणि परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद

परभणी शहर आणि परिसरात तब्बल २३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागात या पावसाची नोंद कऱण्यात आली आहे. २००५ आणि २००६ नंतर १५ वर्षानंतर एवढा पाऊस पडला असल्याचं सांगण्यात येत आहे.  गेल्या २४  तासात २३२  मिमी पाऊस पडण्याची आजपर्यंतची तिसरी वेळ आहे. २००५  साली २४२ मिमी,२००६ साली २३४ मिमी तर२०२१ साली म्हणजे यंदा २३२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कालच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक रस्ते अजुनही बंदच आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार

काल रात्री उशीरापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार झाली. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. सतत चार तासाच्या पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. उस्मानाबादेत नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!