Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ऑक्सिजन अभावी डॉक्टरसह ८ रुग्णांच्या मृत्यूने न्यायालयाने केंद्र सरकारला दिला हा आदेश

Spread the love

नवी दिल्ली : देशाच्या राजधानी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयात आज दुपारी घडलेल्या दुर्घटनेमध्ये ऑक्सिजनअभावी ८ रुग्णांचा  मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ऑक्सिजन पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचे पडसाद दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये देखील पडताना दिसत आहेत. आज याच सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला परखड शब्दांमध्ये फटकारले आहे.

“आता पाणी डोक्यावरून गेले  आहे. आता आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करणार आहात. काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे”, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.

दरम्यान दिल्लीच्या बत्रा रुग्णालयामध्ये ऑक्सजन पुरवठ्याअभावी ८ रुग्णांसह एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील काही रुग्णालयांनी उच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी धाव घेतली आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार या रुग्णालयांकडून केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून जाहीर केलेला साठा देखील पुरवला जात नसल्याची बाजू राज्य सरकारने मांडली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात रोज सुनावणी सुरू असून त्यामध्ये दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारांना न्यायालयाने वेळोवेळी सुनावले आहे.

बत्रा रुग्णालयात काय झाले ? 

आज सकाळीच दिल्लीच्या बत्रा रुग्णालयाने उच्च न्यायालयाला ऑक्सिजन संपल्याची माहिती दिली. “आम्ही सकाळी ६ वाजेपासून एसओएसवर आहोत”, असे  रुग्णालयाने सांगितले  होते. दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने न्यायालयातच याची माहिती देण्यात आली. “१२ वाजता आमचा ऑक्सिजन संपला आणि नवीन साठा दीड वाजता आला. त्यामुळे ८ रुग्ण आणि एका डॉक्टरचा मृत्यू झाला”, असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. या सगळ्या प्रकारावर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावलं.

न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले 

“आम्ही केंद्र सरकारा निर्देश देतो की त्यांनी काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवावा. त्यासाठीचे टँकर पुरवण्याची जबाबदारीही केंद्राचीच आहे. २० एप्रिलला ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय सरकारने घेतला. पण तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस दिल्लीला ठरलेला पूर्ण ऑक्सिजनचा कोटा मिळालेला नाही. कुणीही तुम्हाला ठरल्यापेक्षा जास्त ऑक्सिजन मागत नाही. जर तुम्ही आज पुरवठा करू शकला नाहीत, तर आम्ही सोमवारी तुमचे  विश्लेषण ऐकू”, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने सुनावले.

दिल्लीत १५ हजार नवे बेड !

दरम्यान, यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी लष्कराची मदत घेण्याचा देखील सल्ला दिला. “जर तुम्ही लष्कराची मदत घेतली, तर ते त्यांच्या स्तरावर काम करतील. त्यांच्याकडे त्यांची स्वत:ची व्यवस्था आहे”, असे  न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितले . यावर दिल्ली सरकारकडून अॅडव्होकेट राहुल मेहरा यांनी “आम्ही त्यावर काम करत असून आमचे  सरकार त्यासंदर्भात बोलणी करत आहे. आम्ही १५ हजार नवे बेड तयार करत आहोत’, अशी माहिती न्यायालयाला दिली.  दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!