AurangabadNewsUpdate : नेमकं झालं काय ? पोलीस कारवाई दरम्यान सलून चालकाच्या मृत्यूने तणाव

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात १४ एप्रिलच्या दिवशी लॉक डाऊन च्या नियमाचे पालन करीत असताना , उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सलून चालकाचे दुकान उघडे असल्यामुळे, एक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी बंद करण्यासाठी गेलेला होता . या कारवाई दरम्यान सलून चालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी करीत मृत देह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी चौकशी करून चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधित पोलिसांवर सक्त कारवाईचे आश्वासन पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिल्यानंतर पोलिसांवर संतप्त झालेला जमाव शांत झाला आणि मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रवाना करण्यात आला.
या विषयी मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार , पोलीस ठाण्यासमोरील पीरबाजारात उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी लॉकडाऊन च्या निमित्ताने नियमानुसार बंद असलेली असलेली दुकाने चालू आहेत कि बंद याची खात्री करीत असताना फिरोज खान यांचे दुकान चालू असलेले दिसले त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ आणि पोलीस शपाई भरमे याने याबाबत चौकशी करीत त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली .
दरम्यान यावेळी वाद होऊन झालेल्या झटापटीत सलूनच्या दुकानाचा मालक फेरोज खान दुकानाच्या बाजूला असलेल्या बंद शटरवर कोसळला आणि जखमी झाला तेंव्हा गर्दी जमा झाल्याने पोलिसांनी घटनास्थळावरून पोबारा केला असा आरोप मयत फेरोजखानच्या नातेवाईकांनी केला होता. जखमी फेरोजखानला घटनास्थळावर उपस्थित लोकांनी प्रारंभी खासगी रुग्णालयात आणि नंतर शासकीय रुग्णालयात नेले तेंव्हा डॉक्टरांनी फेरोज खान याला मृत घोषित केले . विशेष म्हणजे फेरोज खान यांच्यावर काही दिवसांपूर्वीच बाय पास सर्जरी झाली होती. आणि रमजानच्या पहिल्याच दिवशी त्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
दरम्यान या घटनेला जबाबदार धरून संतप्त नातेवाईकांनी फेरोजखानचा मृतदेह उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या आवारात आणला आणि संबंधित पोलिसांना फेरोजखान याच्या मृत्यूला कारणीभूत ठरवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत कारवाईची मागणी केली. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी उपायुक्त दीपक गि-हे, सहायक पोलीस आयुक्त रविंद्र साळोखे, काँग्रेसचे पदाधिकारी अक्रम पटेल, ज्येष्ठ पत्रकार बाबा गाडे यांनी मृतांच्या नातेवाईकांची समजूत घालून जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले .
अविनाश आघाव यांच्याकडे चौकशी
दरम्यान खा . इम्तियाज जलील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कादिर मौलाना यांनी तत्काळ उस्मानपुरा पोलीस ठाण्याला भेट देऊन नातेवाईकांची बाजू समजून घेतली त्याचवेळी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी खा . इम्तियाज जलील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कादिर मौलाना यांच्याशी आणि मयत फेरोज यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून आश्वासित केले कि , ज्या दोन पोलिसांमुळे हे घडले असे आपले म्हणणे आहे त्या पोलिसांची तत्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे चौकशी देण्यात येत आहे. इनकॅमेरा पोस्टमार्टेम व्हावे यासाठी घाटीच्या अधिष्ठाता यांना विनंती करण्यात येईल. त्यानंतर मयत फेरोज खान यांच्या नातेवाईकांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी नेण्यास परवानगी दिली आणि तणाव संपला.
निखिल गुप्ता यांची कामगिरी…
यावेळी उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता . या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, रामेश्वर रोडगे, सुरेंद्र माळाळे, संतोष पाटील व सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता परंतु पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी अतिशय संयमाने परिस्थितीवर ताबा मिळवत पोलीस फोर्सला आणि अंग रक्षकांना बाजूला होण्याचे आदेश देऊन स्वतः जमावामध्ये जाऊन जमावाला शांत केले.