Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्यात १४२७ रुग्णांना डिस्चार्ज , आढळले ३४३१ नवे रुग्ण , ब्रिटनहून आलेली एक महिला पॉझिटिव्ह

Spread the love

महाराष्ट्रात १४२७ करोना रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १८ लाख ६ हजार २९८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९४.४ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ३ हजार ४३१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ७१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला राज्यातला मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

ब्रिटनहून आलेली एक महिला आढळली पॉझिटिव्ह

ब्रिटन मधून गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात आलेल्या सर्व प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण आरोग्य विभागाने हाती घेतले असतानाच लंडनहून औरंगाबाद येथे आलेली एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेला तातडीने विलगीकरणात ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहेत. महिलेचे स्वॅब नमुने पुणे येथील एनआयव्ही संस्थेत पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रवाशांचा तपशील सर्व राज्यांना आणि संबंधित स्थानिक यंत्रणांना देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही असा तपशील आला असून पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. त्यानुसार या सर्वच प्रवाशांचे राज्यात सर्वेक्षण सुरू असून लंडनहून औरंगाबाद येथे आलेल्या महिलेला करोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनहून परतलेल्या या ५७ वर्षीय महिलेची करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर या महिलेला एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या महिलेचे स्वॅब नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत ( राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर सदर महिलेला झालेली करोनाची लागण कोणत्या स्वरूपाची आहे हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, २५ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ४४ व्यक्ती औरंगाबाद शहरात विदेशातून आल्या आहेत. त्या सर्वांचीच आता करोना चाचणी केली जाणार आहे. ४४ पैकी १३ जणांचा ठावठिकाणा लागत नसून त्यांच्या शोधासाठी पोलीसांची मदत घेतली जाणार आहे, असे सांगण्यात आले.

दिल्लीत पॉझिटिव्ह आढळलेली महिला आंध्र प्रदेशात सापडली

ब्रिटनवरून परतलेली आणि करोना पॉझिटिव्ह असलेली महिला दिल्ली विमानतळावरून अचानक गायब झाली. ही घटना २१ डिसेंबर रोजी घडली होती. संबंधित महिला आंध्र प्रदेशमधील राजमुंदी येथे गुरुवारी सापडली. महिलेला आणि तिच्या मुलाला आरोग्य अधिकाऱ्यांनी राजमुंद्री रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. या महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत. तिचा मुलगा दिल्लीपासून राजमुंद्रीपर्यंत तिच्यासोबत होता. त्याचीही करोनाचाचणी केली जाणार आहे. त्यांना सध्या जिल्हा रुग्णालयाच्या विशेष विभागात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पूर्वा गोदावरी जिल्हा आरोग्यसेवा समन्वयक डॉ. टी. रमेश किशोर यांनी दिली.

दरम्यान क्वारंटाईन राहण्याची सूचना दिलेली असताना ती महिला निघून का गेली, याबाबत अद्याप तिची चौकशी होणे बाकी आहे, असेही त्यांनी सांगितले. महिलेला लागण झालेला विषाणू नवीन आहे का, याबाबत तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, असाच एक प्रवासी बाधित असतानाही पंजाबमध्ये गेल्याचे दिसून आले आहे.

धारावीत करोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही

दरम्यान कोरोनाचा कहर सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच धारावीत करोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. प्रारंभीच्या काळात मुंबईतल्या धारावीत करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. त्यामुळे मुंबईमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते . त्यानंतर धारावीत कोरोनाचा संसर्ग संपवण्यासाठी विशेष मॉडेल राबवण्यात आले. या धारावी मॉडेलची दखल जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO नेही घेतली आहे. अशात मागील चोवीस तासात धारावीत करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे धारावीसाठी ही बाब निश्चितच दिलासादायक  आहे.

मुंबईतील धारावी परिसरात कोरोना चाचणी, रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्ग झालेल्या रुग्णांवर त्वरित उपचार केल्यामुळे करोनाविरोधातील लढाईत यश मिळालं. रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. आता कौतुकाची बाब म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. धारावी मॉडेल यशस्वी झाल्यानंतर असंच मॉडेल मालेगावातही राबवण्यात आलं होतं. रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व लोकांना समजावून सांगणं तसेच लक्षणं दिसल्यावर वेळीच उपाय करणं या मॉडेलमुळे फायदा झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही स्पष्ट केलं होतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!