MaharashtraCoronaUpdate : ब्रिटन -मुंबई सेवा उद्यापासून बंद , विदेशी प्रवाशांसाठी जारी झाल्या ” या ” सूचना

मुंबईत उद्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनंतर ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खबरदारीच्या उपाययोजनांसाठी तातडीची बैठक घेतली . या बैठकीनंतर मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत कोणत्याही परिस्थितीत नव्या करोना विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून सर्वती खबरदारी घेतली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत बोलताना चहल म्हणाले कि , कोरोनाचा नवा विषाणू कोणत्याही परिस्थितीत येथे येऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. उद्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनंतर ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात एकूण पाच विमाने लंडनमधून मुंबईत येणार आहेत. त्यातून साधारण १ हजार प्रवासी उद्यापर्यंत मुंबईत येतील. या सर्व प्रवाशांना सक्तीने सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत विविध हॉटेल्समध्ये आम्ही २ हजार रूम्सची व्यवस्था केली आहे, असे चहल यांनी सांगितले.
ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्यात येईल. जो प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याला तिथून थेट सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही चहल यांनी नमूद केले. युरोपातील अन्य देश व आखातातील देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी सात दिवसांचे सक्तीचे क्वारंटाईन असेल. हे क्वारंटाइन संपण्याआधी त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल. ती निगेटिव्ह असेल तरच त्या प्रवाशाला घरी सोडले जाईल, असेही चहल यांनी नमूद केले. युरोप व आखात सोडून अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी होम क्वारंटाईन बंधनकारक असेल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार राज्यात उद्यापासून मुंबई महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असून ५ जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. संचारबंदीच्या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. ख्रिसमस व थर्टी फर्स्टमुळे अनेक ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असून करोनाचा धोका टाळण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीचे पाऊल उचलण्यात आले आहे, असेही चहल म्हणाले.