Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : भयानकच !! अंगावर ट्रक घातल्याने वाहतूक पोलीस जागीच ठार

Spread the love

पुणे , नागपूर शहरात कारचालकांनी वाहतूक पोलिसांच्या अंगावर कार घालण्याची प्रकरणे ताजी असतानाच सोलापूरमध्ये एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्यात आल्याचा भयानक  प्रकार समोर आला आहे. यामध्ये या वाहतूक पोलिसांचा जागीच मृत्यू  झाल्याने खळबळ उडाली आहे. दुर्घटनेत मरण  पावलेल्या पोलिसाचे नाव सागर औदुंबर चौबे असे असून आरोपीचे नाव नवनाथ शिवाजी गुट्टे असे आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे टोलनाक्याजवळ हि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. वाहतूक पोलिसाने चालकाला टेम्पो थांबवण्यास सांगितले असता त्याने पोलिसाच्या अंगावरच टेम्पो घातला असून या अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. सागर चौबे यांना धडक देऊन टेम्पो पुढे गेला होता. आरोपी नवनाथ पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र अपघातस्थळी हजर असलेल्या काही तरुणांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पोलीसही हादरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ गुट्टे हा आयशर टेम्पो (क्र. एमएच. ०४. एचडी. ०१७०) घेऊन हैदराबाद येथून मुंबईच्या दिशेने चालला होता. टेम्पोत औषधोपचाराशी संबंधित साहित्य होते. दरम्यान, वरवडे टोलनाका येथे टेम्पो आला असता पोलीस नाईक सागर चौबे यांनी तपासणीसाठी टेम्पो थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालक नवनाथ गुट्टे याने तो इशारा न जुमानता टेम्पो थेट सागर चौबे यांच्या अंगावर घातला. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या चौबे यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेची  गंभीर दखल घेत याप्रकरणी उच्चस्तरीय बैठक बोलवणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. या  ट्रक चालकावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगताना पोलिसांवरील हल्ल्यांसदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. अधिवेशन काळात यासंदर्भात आपण एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहोत. विशेषतः महामार्गावरील वाहतूक पोलिसांना आणि संबंधित सर्वच यंत्रणांबाबत या बैठकीत एकत्रीत चर्चा होईल, असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. चालक बेदरकारपणे महामार्गावर वाहनं चालवतात, यासाठी आत्ताच्या नियमांपेक्षा अधिक कडक नियम करणं आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम पहिल्यांदा, दुसऱ्यांदा मोडल्यास शिक्षा होते पण वारंवार जर हे झालं तर त्याचं लायसन्स रद्द करणं गरजेचं असल्याचंही देसाई यावेळी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!