PuneNewsUpdate : आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका , पुण्यात ओबीसींचा मोर्चा , समीर भुजबळ , रुपाली चाकणकर यांना अटक

‘उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, ‘जय ज्योती जय संविधान’ अशा घोषणा देत पुण्यात ओबीसी आरक्षणच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेसह विविध संघटनानी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान विनापरवानगी मोर्चा काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.
शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार दीप्ती चौधरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . ‘उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, ‘जय ज्योती जय संविधान’ यासह विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चाला पोलीस विभागाची परवानगी नव्हती. तरी मोर्चेकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने समीर भुजबळ, रूपाली चाकणकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर आंदोलनामुळे शनिवार वाड्याच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.
दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ म्हणाले की, “राज्यातील ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात आम्ही आंदोलनाची तयारी केली होती. मात्र पोलिसानी आम्हाला मोर्चा काढू दिला नाही.” आमची आज ही तीच भूमिका आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं, असंही ते म्हणाले.