MarathwadaEducationUpdate : राज्यातील संस्थाचालकांना चिंता , शाळा सुरु कराव्यात कि नको ….जवळपास १०० शिक्षक कोरोनाबाधित

राज्य सरकारने अनलॉक प्रक्रियेअंतर्गत सोमवार दि. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत . मात्र सध्याच्या काळात अनेक शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने आणि कोरोनापासून बचावाची सर्व जबाबदारी शासनाने संस्थाचालकांवर टाकल्याने शाळा सुरु कराव्यात कि नाही ? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्याने मात्र ३१ डिसेंबरपर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे . तर राज्य शासनाने हा निर्णय त्या त्या जिल्हा प्रशासनावर सोपवला आहे .
सरकार आणि प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण शाळा सुरु करण्यापूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये अनेक जिल्ह्यातील शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कोविड आरटी-पीसीआर चाचणी केली जात असून त्यात अनेक शिक्षक पॉझिटिव्ह आढळत असल्याचं समोर आलं आहे.
मराठवाड्यातील स्थिती काय आहे ? तूर्त शाळा सुरु न करण्याची मागणी
उपलब्ध माहितीनुसार उस्मानाबादमध्ये झालेल्या चाचणीत ४८ शिक्षक पॉझिटिव आढळले आहेत. तर नांदेडमध्ये एकाच शाळेतील अकरा शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय औरंगाबादमध्ये पंधरा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव असल्याचं समोर आलं आहे. बीड जिल्ह्यात २५ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. परळीचे तालुका सचिव बंडू आघाव यांनी राज्य सरकारकडून शाळा सुरु करु नयेत अशी मागणी केली आहे. शाळा सुरु करुन विनाकारण कोरोनाला निमंत्रण देऊ नये. शाळा सुरु केल्या तरी पालक आपल्या पाल्याला आताच्या परिस्थितीत शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा आणि शिक्षण सुरु ठेवावे.