PuneNewsUpdate : अल्पवयीन मुलीवर बलात्कार , आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरी

पुण्यातील एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीला खेळण्याच्या बहाण्याने टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका १८ वर्षीय तरुणाला कोर्टाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
सोन्या उर्फ भरत हरिश्चंद्र घोलप असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी १० वर्षीय पीडीत मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली होती. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनिल हांडे यांनी पाहिले. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शैलजा जानकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलीस हवालदार आर. एन. त्यांना न्यायालयीन कामकाजात मदत केली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची फिर्याद देण्यात आल्यानंतर तिला होस्टेलला राहावे लागले. तिला आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागले. या प्रकरणातील आरोपीने त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होऊन योग्य संदेश समाजात जाणे आवश्यक आहे, असे नमूद करत न्यायाधीशांनी आरोपीला शिक्षा सुनावली.