Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : वेळेवर कार्डियाक रुग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यात कोरोनाबाधित पत्रकाराचे निधन

Spread the love

पुण्यातील टीव्ही ९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेत कार्डिअॅक अँब्युलन्स न मिळाल्याने  त्यांचे आज पहाटे निधन झाले . या घटनेमुळे  सरकारवर टीका होत आहे. दरम्यान प्रारंभी पुण्याच्या पत्रकारांना साधी प्रतिक्रियाही न देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उशिरा या घटनेची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ‘या प्रकरणाची चौकशी केली जाईल. पुणे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना या संदर्भात सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार पांडुरंग रायकर  42 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि आई-वडिल असं कुटुंब आहे. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे पांडुरंग यांचा जीव गेला. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तर सर्व माध्यमांमध्ये शोककळा पसरली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी कि, पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर पांडुरंग रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. २७ ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. मात्र तिथेही त्यांना त्रास सुरू होता. त्यामुळं त्यांची कोपरगावमधे एंटीजेन टेस्ट करण्यात आली ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर रविवारी ३० जुलैला रात्री त्यांना एम्ब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आलं आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं.

जंबो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आय.सी.युमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची परिस्थिती खालावत होती. दरम्यान  त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले. मंगळवारी त्यांची ऑक्सीजन पातळी ७८ पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलममधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक एम्ब्युलन्सची गरज होती. अशी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते. मंगळवारी रात्री एक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं. यानंतर दुसरी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्या एम्ब्युलन्समधे डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा – सव्वाबारा वाजले होते. पहाटे 4 ला एम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला. पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.

दरम्यान दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे ५ वाजता एम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आय.सी.यु मधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं.  याच्या थोड्याच वेळात कार्डिॲक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!