AurangabadNewsUpdate : ब्लॅकमेल करून महिलेवर अत्याचार करणारा पोलिस कर्मचारी अटकेत

लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध प्रस्थापित केलेल्या व्हिडीओचे चित्रीकरण करुन लग्न मोडण्यासाठी भावी पतीला शारिरीक संबंधाचे व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील शिपायाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रविंद्र दाभाडे (३६, रा. सिध्दार्थनगर, टिव्ही सेंटर, हडको) याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
हडको भागातील एका २४ वर्षीय तरुणीला पोलिस शिपाई रविंद्र दाभाडे याने लग्नाचे अमिष दाखवत इच्छेविरुध्द शारिरीक संबंध प्रस्थापित केले होते. त्यासाठी २०१५ ते २०२० याकाळात तिला वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तो घेऊन गेला. तरुणीच्या नकळत शारिरीक संबंधांचे व्हिडीओ तयार केले. त्यानंतर एकेदिवशी तरुणीचा साखरपुडा झाला. त्याचदिवशी तिला पुन्हा रेल्वे स्टेशनच्या एका हॉटेलात दाभाडेने बोलावून घेतले. तत्पुर्वी तिला व्हिडीओ चित्रीकरण केल्याचे खोटे सांगत पुन्हा शारिरीक संबंध केले. त्याच शारिरीक संबंधाचे व्हिडीओ त्याने तरुणीच्या भावी पतीला पाठवले. त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले होते. याप्रकारानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नव्हती. पुढे न्याय मागण्यासाठी ही तरुणी महिला तक्रार निवारण केंद्रातही गेली होती. पण तेथे सुध्दा तिच्या पदरी निराशाच आली. अखेर १ आॅगस्ट रोजी तरुणीने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेत हकीकत कथन केल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या अनुषंगाने दाभाडेला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याला सोमवारी अटक करण्यात आली.