Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : करोना मृत्यूदर कमी करणे नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे, मुख्यमंत्री

Spread the love

सर्व जिल्ह्यांमधून करोना रुग्णांवर योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यूदरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून करोना मृत्यूदर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईस्थित राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज संवाद साधला व चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

‘करोना मृत्यूदर कमी करणे नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत हे पाहून त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे. म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण आयोजित केली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहेत. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले’, असे सांगतानाच रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

डॉ. तात्याराव लहाने यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी यावेळी सांगितले की, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जातात त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधे देऊ नयेत. अडचण येईल तेव्हा तात्काळ आम्हाला संपर्क करा.

डॉ राहुल पंडित म्हणाले, ही विशेष औषधे महत्त्वाची नाहीत तर रुग्णांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. ऑक्सिजन उपलब्ध ठेवणे खूप आवश्यक आहे. डॉ शशांक जोशी, डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी देखील उपचारांविषयी जिल्ह्यांच्या डॉक्टर्स व शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली व शंकानिरसन केले तसेच उपचाराविषयी सूचना केल्या. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन आधीच करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!