Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुण्यात आता कडक संचारबंदी , फक्त दोन तासांची ढील ….

Spread the love

पुणे शहरात आधीच संचारबंदी लागू असताना देखील काही भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढल्याने शहरातील काही भागांमध्ये पूर्वीच्या आदेशांमध्ये अंशतः बदल करुन नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये संचारबंदी अधिक कडक करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणतात, “खडक, फरासखाना, स्वारगेट, कोंढवा या चार पोलीस स्टेशनच्या हद्दींमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार करणे, वाहतुक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यांना मनाई करण्यात आली आहे. ७ एप्रिल २०२० पासून संध्याकाळी ७ वाजल्यापासून १४ एप्रिल २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.”

दरम्यान पुण्यातील कडक संचारबंदीचे नवे आदेश लागू झालेल्या भागातील जीवनावश्यक वस्तू व सेवा (दूध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळं व भाजीपाला) पुरवणारी दुकानं केवळ दोन तासांसाठीच (सकाळी १०.०० ते दुपारी १२.००) खुली राहणार आहेत. या दुकानांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जाणीवपूर्वक गर्दी टाळण्याची जबाबदारी दुकानदारांवर असेल. तसेच यासाठी आवश्यक सोशल डिस्टंसिंगचे भानही ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा अशी दुकानं पोलिसांकडून बंद करण्यात येणार आहेत. तसेच या प्रतिबंधीत भागांमध्ये बँकांनी ग्राहकांना बँकिंग सुविधांसाठी केवळ एटीएम केंद्रचं उघडी ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!