Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले हे महत्वाचे खुलासे …

Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठा खुलासा करताना सांगितले कि , केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेत फक्त तांदूळ वाटपाचा समावेश आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांनाच तांदूळ मिळणार असून केशरी कार्डधारकांना केंद्राने या योजनेतून वगळलं आहे, मात्र असे असले तरी राज्य सरकारकडून मात्र मध्यमवर्गीयांनाही ८ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप करायला सांगूनही राज्य सरकार धान्य वाटप करत नसल्याच्या भाजपच्या आरोपातील हवा निघून गेली आहे. ‘करोना’ची साथ आणि राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेताना लोकांना काही सूचनाही केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  सातत्याने राज्यातील नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत असून त्यांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज या विषयावर बोलताना त्यांनी  करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचं त्यांनी आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी मोफत अन्नधान्य वाटपावरून होत असलेल्या भाजपच्या आरोपांमधील हवा काढून टाकली. केंद्राच्या योजनेत केवळ तांदळाचं मोफत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे तांदळाचं वाटपही सुरू झालं आहे. मात्र केंद्राने केवळ दारिद्रयरेषेखालील लोकांनाच मोफत तांदूळ वाटप करण्यास सांगितलेलं आहे. त्यात केशरी कार्डधारकांचा समावेश नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांना या योजनेचा लाभ मिळत नाही, असं सांगतानाच केशरी कार्डधारक मध्यमवर्गीयांसाठी योजना आखण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे. त्यांच्याशी फोनवरूनही बोललो असून त्यांना पत्रही पाठवलेलं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान सर्वच जण अडचणीचा सामना करत असल्याने राज्य सरकारने केशरी कार्डधारक मध्यमवर्गीयांसाठी ८ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने २ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याला किमान आधारभूत किंमतीवर आणखी धान्य मिळावं म्हणून आम्ही केंद्राकडे मागणीही केली आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. तसेच राज्यसरकार शिवभोजन योजनेतून रोज साडेपाच सहा लाख लोकांना अन्न पुरवत आहे. लोकांच्या तीनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास आणखी व्यवस्था करू, असेही त्यांनी सांगितलं.

साधनसामुग्रीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले ….

राज्यातील करोना रुग्णांना व्हेंटिलेटरची कमतरता भासू नये म्हणून महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही कंपन्या व्हेंटिलेटर तयार करत आहेत. या कंपन्यांना व्हेंटिलेटरचं उत्पादन करण्याचा अनुभव नसला तरी त्यांच्याकडून व्हेंटिलेटर घेताना ते तपासूनच घेतलं जाईल. त्यामुळे राज्यात व्हेंटिलेटरचा प्रश्न निर्माण होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पीपीटी किटचा तुटवडा आहे. अमेरिकेनेही आपल्याकडे मदत मागितली आहे. मात्र, असं असलं तरी आपणही पीपीटी किट तयार करण्याचं काम करत आहोत. हाही प्रश्न सुटणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. करोनाविरोधातील युद्ध जिंकल्यानंतर आपल्याला आणखी एक युद्ध लढावं लागणार आहे. ते म्हणजे आर्थिक संकटाविरोधातील हे युद्ध आहे. आर्थिक संकट हे एक जागतिक युद्ध असेल. संपूर्ण जगात आर्थिक संकटावर मात करण्यासाठी चढाओढ लागलेली असेल आणि हे युद्ध सुद्धा आपण नक्कीच जिंकू असा मला विश्वास आहे. त्यामुळे या युद्धात लढण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या फिट आणि सक्षम असणं गरजेचं आहे. त्याकरिता घरीच थांबा. घरातल्या घरात योगा करा. व्यायाम करा. मन आनंदी आणि प्रसन्न ठेवणारे कार्यक्रम पाहा. आवडत्या छंदामध्ये स्वत:ला गुंतवून घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

मास्कचा वापर छत्रीसारखा करू नका….

करोनामुळे जापानमध्ये आणीबाणी लागण्याची शक्यता आहे. सिंगापूरमध्ये लॉकडाऊन वाढवलेला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत चीनच्या वुहानमध्ये लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. ही दिलासादायक बातमी आहे. तब्बल ७४-७५ दिवसानंतर हा निर्बंध उठवण्यात आला आहे. त्यामुळे हे ताणलं गेलं तर कुठपर्यंत ताणलं जाऊ शकतं हे लक्षात येतं. मात्र हे दिवसही जाणारच. आपण या युद्धात जिंकणारच. आपण हिंमतीने हे युद्ध जिंकू. त्यासाठी तुमची तंदुरुस्ती हवी, असंही ते म्हणाले. ‘करोनाचा विषाणू कधी, कसा, कुठून हल्ला करतोय हे कळायला मार्ग नाही. त्यामुळं जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडतानाही मास्क वापरा. मात्र, त्याचा वापर छत्रीसारखा सामूहिक करू नका. प्रत्येकासाठी स्वतंत्र मास्क ठेवा,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला केलं.

स्वतंत्र ‘फिव्हर क्लिनिक’ ची स्थापना…

राज्यातील आरोग्य सेवेबद्दल मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. ‘प्रत्येक विभागात फिव्हर क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या क्लिनिक कुठे असतील त्याची माहिती लवकरच आपल्याला दिली जाईल. सर्दी, खोकला व तापाची लक्षणं असणाऱ्यांनी तिथंच जायचं आहे. फिव्हर क्लिनिकमध्ये तपासणी झाल्यानंतर त्यांना पुढचा सल्ला दिला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘कोविड’ रुग्णालयांचीही आजाराच्या तीव्रतेनुसार विभागणी करण्यात येणार आहे. सौम्य लक्षणं असलेल्यांसाठी एक रुग्णालय असेल. मध्यम स्वरूपाच्या लक्षणांसाठी वेगळं रुग्णालय असेल. तर, तीव्र स्वरूपाच्या लक्षणांसाठी व मधुमेह, रक्तदाब, किडनीचे विकार असलेल्या रुग्णांसाठी सुसज्ज असं वेगळं रुग्णालय असेल. तिथं सगळे निष्णांत डॉक्टर असतील. ‘फिव्हर क्लिनिक’ धरून राज्यात आरोग्य सेवेचे चार विभाग असतील. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे करत आहोत,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!