Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : बीपीएल बरोबर एपीएल शिधापत्रिका धारकांनाही धान्य देण्यास मान्यता….

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्तीमागे देण्यास  मान्यता दिली असून या निर्णयामुळे त्यांना ८ रुपये प्रती किलो गहू आणि १२ रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती देखील केली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या ३ कोटी ८ लाख एपीएल शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होईल. त्यासाठी सुमारे २५० कोटी खर्च येणार असून मे आणि जून या महिन्यासाठी हे धान्य दिले जाईल. सध्या जे धान्य केंद्र सरकारकडून मिळते त्या व्यतिरिक्त १ लाख ५४ हजार २२० मेट्रिक टन धान्याची मागणी यासाठी करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान आधारभूत किंमतीच्या दराने धान्य देण्याबाबत केंद्राचे जे धोरण आहे त्याला अनुसरूनच सवलतीच्या दरात धान्य मिळावे, अशी मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, पांढरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांसाठीही लवकरच महत्त्वाची घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत. केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय आज (मंगळवार) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरानं अन्नधान्य देण्यात येणार आहे.

पंतप्रधानांच्या मोफत धान्य योजनेप्रमाणे राज्याने स्वतंत्र योजना तयार करुन अन्नसुरक्षेचा शिक्का नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मोफत धान्य द्यावे. त्याचा खर्च आमदार निधीतून करावा, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने हातावर पोट असलेल्या आणि गरीब गरजुंसाठी अन्नधान्याच्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. मात्र केशरी शिधापत्रिकाधारकांचाही राज्य सरकारने योग्य तो विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर आज पार पडलेल्या बैठकीत केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाच्या निर्णयमांमध्ये १. केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत. ,२. कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा., ३. शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.,  ४. कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती आदी निर्णयांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!