#Aurangabad : विनाकारण फिरणा-या ९२५ वाहन धारकावर कारवाई पोलिसांनी जप्त केली १९ जणांची वाहने

औरंंंगाबाद : संचारबंदीच्या काळातही रस्त्यावर विनाकारण फिरणा-या वाहनधारकांवर शहर पोलिसांनी १ एप्रिलपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्या दिवशी ७२४ वाहनांवर कारवाई करणा-या पोलिसांनी दुस-या दिवशी जवळपास ९२५ वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली. त्यापैकी १९ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच शहरातील विविध पोलिस ठाण्यात २४२ जणांवरही पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू असतांना देखील अनेक वाहनधारक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर पोलिसांनी १ एप्रिलपासून विनाकारण रस्त्यावर फिरणा-या वाहनधारकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. १ एप्रिल रोजी पोलिसांनी शहरातील विविध भागात विनाकारण फिरणा-या ७२४ वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली होती. कारवाईची मोहिम सलग दुस-या दिवशीही राबवत पोलिसांनी विनाकारण फिरणा-या जवळपास ९२५ वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांना समाधानकारक उत्तरे न देणा-या १९ जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
दरम्यान, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-या २४२ जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.