Aurangabad Corona Virus update : पोलिसांच्या उद्घोषणेची “ती” व्हिडीओ क्लिप पूर्णतः फेक , अफवा पसरवू नका ….औरंगाबाद शहरातील सर्व दुकाने उघडी आहेत !!

कोरोना व्हायरसच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेक ऑडिओ , व्हिडीओ , क्लिप व्हायरल होत असून यातील अनेक क्लिप्स या फेक असल्यामुळे पोलिसांबरोबर सर्वसामान्य लोकांचीही मोठी अडचण होत आहे. दरम्यान असाच एक व्हिडीओ गेल्या चार दिवसांपासून पुण्याचा आहे असे भासवून व्हायरल करण्यात येत होता. दरम्यान याबाबत पुणे पोलिसांनी खुलासा करताना म्हटले आहे कि , ‘पुण्यात तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यादरम्यान फक्त दूधविक्री केंद्रे सुरू राहतील’ अशी एक क्लिप आज व्हायरल झाल्याने पुणेकर हादरून गेले . दरम्यान, ही क्लिप पुण्यातील नाही. त्यामुळे कृपा करून कुणी अफवा पसरवू नये, असे निवेदन सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांना जारी करावे लागले.
दरम्यान हा व्हिडीओ आता इतर जिल्ह्यातही व्हायरल केला जात असून आज सायंकाळी मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात विविध ग्रुपवर पोलिसांची कुठलीही शहानिशा न करता पोस्ट केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. वास्तविक हा तोच व्हिडीओ आहे ज्याचा खुलासा पुणे पोलिसांनी केला आहे. या खुलाशात पुणे पोलिसांनी म्हटले आहे कि , ‘एका चौकात पोलिसांची व्हॅन उभी आहे व त्या व्हॅनमधून तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे’, अशाप्रकारची व्हिडिओ क्लिप पुण्यात आज व्हायरल झाली आणि सर्वांचीच झोप उडाली. पुणे पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत ही क्लिप फेक असल्याचे तातडीने स्पष्ट केले व अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. या क्लिपबाबत सांगताना सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले की, जी क्लिप व्हायरल झाली आहे ती पुण्यातील नाही. त्यामुळे या क्लिपवर विश्वास ठेवून कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. या क्लिपचा पुण्याशी काहीही संबंध नाही.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आधीच जमावबंदी तसेच वाहतूक बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. या आदेशांतून जीवनावश्यक वस्तूंची विक्री, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. या सेवा सुरूच राहणार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आम्ही आवाहन करत आहोत, असे शिसवे म्हणाले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. त्याबाबत सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे सर्वांनी पालन करावे, अशी आमची विनंती आहे. सध्या सर्वांसाठीच कठीण काळ आहे. अशावेळी कृपा करून अफवा पसरवू नका. तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे, असेही शिसवे यांनी पुढे नमूद केले.
दरम्यान आता हीच क्लिप औरंगाबादकर व्हायरल करीत आहेत जी पूर्णतः फेक असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. यात पोलीस व्हॅन असल्यामुळे यावर कोणाचाही विश्वास बसत आहे. आज कोरोना लॉक डाउनच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सायंकाळी एक पत्रक जारी करून या आदेशानुसार १ एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत कुठलेही वाहन पर्वांगीशिवाय शहरातील रस्त्यावर कुठलेही वाहन धावणार नसल्याचे म्हटले आहे. पोलीस आयुक्तांचे हे पत्रक आणि व्हायरल झालेला व्हिडीओ या दोन्हीचा चुकीचा अर्थ लावून उद्या दि . १ एप्रिलपासून संपूर्ण शहरात संचारबंदीमुले पूर्णतः बंद असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत जेंव्हा कि , पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी म्हटले आहे. लोकांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल मात्र त्यासाठी घरातील केवळ एका व्यक्तीने दुकानात जावे. शिवाय दुकानांवर सुद्धा नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या २१ दिवसांपैकी सात दिवसाचा पहिला आठवडा संपला असून दुसऱ्या सप्ताहाला प्रारंभ होत आहे. आणि हे सात दिवस अत्यंत महत्वाचे आहेत . त्यामुळे कोणीही घराच्या बाहेर पडू नये . कोणीही अफवा पसरवू नये.